◾विक्रमगड तालुक्यात झालेल्या भ्रष्टचारा विरोधात युवा प्रहार ग्रुपचे आमरण उपोषण सुरू; भ्रष्टचाराविरुद्ध लढ्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: विक्रमगड तालुका हा येथील ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने अक्षरश धुवून खाल्ला आहे. तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरुद्ध येथील तरुण एकत्र येत युवा प्रहार ग्रुपच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला पालघर जिल्ह्यातून त्यांना सामाजिक संघटनांचा आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.
विक्रमगडच्या भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांन विरोधात युवा प्रहार ग्रुपच्या युवकांनी सोमवार 26 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. उपोषणकर्तांनी विक्रमगडच्या एका सामाजिक कार्यकर्ते असलेल्या बड्या ठेकेदारांवर गंभीर आरोप केल्याने विक्रमगडचा भ्रष्टाचार चर्चेचा विषय बनला आहे. तालुक्यातील मालवाडा येथील हातोबा देवस्थानात काम अर्धवट व निकृष्ठ करून पैसे काढण्यात आले असून सदर ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच 2018 ते 2019 मध्ये 0 ते 4 बजेटची कामे न करता अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने बिले काढली आहेत. त्याच बरोबर 2016 मध्ये 50/54 व 04 जनजाती क्षेत्र विक्रमगड ते आंबेघर, पडवळपाडा ते आंबेघर असे रस्ते दाखवून एकाच रस्त्यावर चार वेळा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने बिले काढली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विक्रमगड तालुक्यातील मनोर ते विक्रमगड या रस्त्यावरील खड्डे बुंजण्याचे काम करण्यात आले होते. त्यांनतर एका महिन्यात चीफ अधिकारी मुंबई यांच्याकडून 19 कोटी 54 लाख रुपयांचे काम काढण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप युवा प्रहार ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्याच बरोबर तलवाडा-पाली रस्त्याचे काम निकृष्ठ झाले असून हे काम करणाऱ्या ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या संगणमताने शासनाचा निधी लाटला असल्याने त्यांची चौकशी करावी अशा विविध मागण्या या तरुणांच्या असून अशा भ्रष्टाचारी अधिकारी आणि ठेकेदारांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार असल्याचे मिठाराम भोईर, प्रमोद पाटील, रुपेश डोले, अनिल पाटील उपोषणकर्त्यांचा म्हणणे आहे.
◾ भ्रष्टाचाराविरुद्ध चालू झालेल्या लढ्याला पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळू लागला असून खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश (बंटी) पाटील, देवा ग्रुपचे तानाजी मोरे, उदय नियोगी शिवसेनेचे आमदार रवींद्र जी फाटक, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा , वसंत चव्हाण, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, देवा ग्रुप फाउंडेशन वाडा तालुक्याचे कार्यकर्ते यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला.