
◾ राष्ट्रीय हरित लवादाच्या कारवाईत सर्वात जास्त प्रदूषणकारी ठरलेल्या कारखानदारांकडून घातक रसायनाची विल्हेवाट
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकारी कारखान्यांनी घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी नवनव्या युक्त्या सुरू केल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागात असलेल्या डब्ल्यू झोन मध्ये एका बंद असलेल्या कारखान्याच्या भागात घातक रसायनाने भरलेले टँकर खाली केले जात असल्याचे दिसून येत आहे. येथील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यात हे रासायनिक सांडपाणी येत असून संपूर्ण बाजूला असलेल्या गावात हे घातक रासायनिक सांडपाणी वाहून जात असल्याने मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण वाढत चाललेले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक प्रदूषण हे काय नवीन नाही, कुठेही घातक रसायन सोडले तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने प्रदूषणकारी कारखान्यांना अभय आहे. असाच प्रकार बुधवारी 28 आँक्टोबर रोजी दुपारी दिसून आला. औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागातील डब्ल्यू झोन मधील रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीतुन घातक रसायन बाहेर येत असल्याचे दिसून येत होते. पिवळ्या रंगाचे असलेले रसायन या भागात कोणत्याही कारखान्यात बनत नसल्याने येथील काही उद्योजकांनी सांगितल्यावर हे रसायन कुठून आले हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठी प्रदूषणकारी कारखाना म्हणून एनजीटीने कारवाई केली आहे. हा कारखानदारा कडून टँकर मधून रासायनिक सांडपाणी डब्ल्यू झोन मध्ये असलेल्या बंद कारखान्यात सोडले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बंद कारखान्यातुन छुप्या पध्दतीने पाईपलाईन टाकून रात्री वेळी रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत घातक रसायन सोडले जाते आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत येत असलेल्या रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या चेंबर ला वरच्या बाजूला पाईप टाकून रासायनिक पाणी निघण्यासाठी बेकायदेशीर पणे मार्ग बनविण्यात आला आहे. या मार्गातून रासायनिक सांडपाणी नेट पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारात जात असून त्यानंतर रासायनिक सांडपाणी थेट नैसर्गिक नाल्यातुन शेतजमिनी असलेल्या भागात जात आहे. यामुळे आजूबाजूला असलेल्या गावातील शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य सांडपाणी वाहिनीत बेकायदेशीर पणे रासायनिक सांडपाणी सोडले जात असताना व चेंबर मधून पाईप द्वारे रासायनिक सांडपाणी पावसाळी पाणी वाहुन नेणाऱ्या नाल्यात जात असताना देखील संबंध औद्योगिक विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुख्य सांडपाणी वाहिनीला छुप्या पध्दतीने जोडलेल्या वाहिन्यांची तपासणी करून कारवाई करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालले असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकांन कडून केला जात आहे.
◾ टँकर माफियांचा प्रताप
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सर्वात प्रदूषणकारी ठरलेल्या एका उद्योजकांने सत्तरबंगला भागात एक बंद असलेला कारखाना घेतला आहे. या उद्योजकांच्या इतर कारखान्यातुन रोज लाखो लिटर घातक रसायन बाहेर पडत असून हे रसायन मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठविण्याची प्रक्रिया खर्चिक असल्याने साधारण 10 टँकर मधून हे घातक रसायन याभागात असलेल्या बंद कारखान्यांच्या भागातून मुख्य सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडले जाते. एक टँकर घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी केमिकल माफियांना सुमारे 30 ते 35 हजार रूपये मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
◾ नाल्यात सोडलेल्या केमिकल बाबत त्या विभागाचे क्षेत्र अधिकारी गजानन पवार यांना तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
— मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर