पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: करोनाच्या महामारीच्या संकटामध्ये अनेक वनौषधी, अनेक सत्व, काढे बाजारात उपलब्ध झाले आहेत. “जुने ते सोने” म्हणत सर्व लोकं जुन्या उपचारांकडे वळल्याचे पहावयास मिळत आहे. योग, प्राणायाम, खाण्याच्या विशिष्ट सवयी, आहार या सर्वांकडे प्रत्येकजण हेतुपूर्वक लक्ष देताना दिसुन येत असतानाच रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी गुळवेल ही वनस्पती सर्वांसाठी वरदान ठरली असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.
गुळवेल ह्या वनस्पतीला भारत सरकारने राष्ट्रीय औषध म्हणून जाहीर केले आहे. ग्रामीण भागात जंगलामध्ये आढळणा-या या वनस्पतीचा उपयोग विविध आजारांवर अनेकजण करीत असुन त्याचा फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे. गुळवेल ही आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाची व गुणकारी वनस्पती समजली जाते. ही औषधी वनस्पती एखाद्या झाडाचा आधार घेऊन वर चढणारी एक वेल आहे. विशेष म्हणजे ही वेल नेहमीच हिरवीगार दिसते. ही वनस्पती मनीप्लांटसारखी दिसते. हृदयाच्या आकाराची पाने असलेली ही वनस्पती हृदयाची काळजी घेणारी औषधी वनस्पती असल्याचे आयुर्वेदिक डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.
गुळवेल वनस्पतीला पिवळी फुले येतात व लाल रंगाची झुबक्यांमध्ये छोटी-छोटी गोल फळे येतात. रसभरीत असलेले कांड (वेळीचे खोड) औषधासाठी उपयोगात आणले जाते. हे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरले जाते. गुळवेल ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, भूक वाढवणे, रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे यावर अत्यंत गुणकारी असल्याचे आयुर्वेदचार्यांकडून सांगितले जात आहे. गुळवेलच्या सेवनाने रक्तामधील साखरेवर देखील नियंत्रण राखले जाते. मधुमेह आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णास गुळवेल अत्यंत उपयुक्त ठरते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने गुळवेलचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे सेवानिवृत्त वैद्यकिय कर्मचारी रमेश ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनाच्या या संकटसमयी प्रत्येक माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल ही वनस्पती नवसंजीवनी ठरली असल्याचे या वनस्पतीचा नियमित वापर करणा-या विजया विजय पाटील यांनी सांगितले.
◾वापर कसा करावा
गुळवेळचे कांड चे दोन इंचाचे तुकडे करुन ठेवणे, व या तुकड्यांमधील दोन ते तीन तुकडे ठेचून ते दोन ग्लास पाण्यात टाकून हे पाणी निम्मे होईपर्यंत उकळावे. पाणी थंड झाल्यावर ते गाळून सकाळी रोज उपाशी पोटी पिणे.
◾ शरिरामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याचा गुणधर्म गुळवेल या वनस्पतीमध्ये आहे.
— डॉ.सानिका संतोष भोईर, आयुर्वेदिक चिकित्सक, कुडूस, ता. वाडा.
◾गुळवेल नियमित सेवन करीत असल्याने त्वचा सतेज राहण्यास मदत झाली आहे.
— रुपेश मोकाशी, तुसे ता. वाडा.