◾ वाड्यातील तरुणांनी लाँकडाऊन काळात केली आल्याची लागवड
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: आले हे अतिशय आयुर्वेदीक व औषधी असून दररोजच्या जेवणात तसेच मसाल्यात आल्याचा वापर सर्रास केला जातो. वाडा तालुक्यातील विलकोस (सरसओहोळ) या गावात तिघा तरुणांनी आल्याचे हेच महत्व ओळखून आल्याची लागवड केली आहे. अतिशय नियोजनबद्ध केलेल्या या शेतीतून त्यांना चांगला नफाही मिळणार असल्याने तालुक्यात केलेल्या या उपक्रमाचे कुतूहल निर्माण झाले आहे.
वाडा तालुक्यातील विलकोस येथील हेमंत सांबरे, कल्पेश किणगे व प्रविण पाटील या व्यावसायिक तरुणांनी लॉकडाऊन काळात घरी बसून करायचे काय या विचाराने आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आल्याची लागवड व त्याबाबत सर्व माहिती आधी इंटरनेट व नंतर नाशिक येथील काही ओळखीच्या शेतकऱ्यांकडून घेतली. हेमंत यांनी मागील वर्षी आपल्या जागेत बटाटे लागवड यशस्वी केली असल्याने आल्याला जमीन पूरक असल्याचे त्यांच्या लक्षात आले व आपल्या एक एकर शेतीत त्यांनी आल्याची लागवड केली.
उखळण करून सऱ्या ओढल्या नंतर त्यात गोमूत्र, शेणखत, कोंबडखत व ठिबक द्वारे पाणी व्यवस्था करून 15 जून ला 160 किलो आल्याच्या बियाणांची लागवड करण्यात आली.17 हजारांचे बियाणे यासाठी लागले असून आतापर्यंत आल्याच्या शेतीला 50 हजारांचा खर्च करण्यात आला आहे. सहा महिन्यात हे पीक अगदी तयार होणार असून बाजार भावाप्रमाणे हे पीक शेतातून काढता येते.
डिसेंबरमध्ये साधारण 2 टन आल्याचे उत्पन्न निघेल अशी अपेक्षा या तरुणांना असून यातून त्यांना योग्य भाव असल्यास 2 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. आल्याला स्थानिक बाजारपेठ किंवा औषध उत्पादित कंपन्यांत चांगली मागणी असल्याने बाजारपेठेची चिंता या तरुणांना नाही. वाडा तालुक्यातील हा दुर्मिळ प्रयोग असून भाजीपाला व अन्य शेती उत्पादनाला बाजारपेठेचा अभाव असलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांनी यातून नक्कीच प्रेरणा घ्यावी असे या तरुणांचे मत आहे.