◾नविन पुलाचे काम कधी होणार, नागरिकांचा सवाल
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: अत्यंत रहदारीचा असलेल्या वाडा-मनोर या राज्य महामार्गावरील देहेर्जे नदीवरील पुल हे धोकादायक बनले आहे. या पुलावरुन होत असलेल्या अवजड वाहतुकीस बंदी घालावी व नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाचे उर्वरित काम तात्काळ पुर्ण करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वाडा-मनोर हा राज्य महामार्ग अत्यंत महत्त्वाचा असुन या महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. या पुलावरुन 60 ते 80 टन वजनाचा माल घेऊन जाणारी अवजड वाहने ये-जा करीत आहेत. 60 वर्षांपूर्वी देहेर्जा नदीवर करळगांव येथे बांधलेला हा पुल सद्या कमजोर झालेला आहे. अवजड वाहने जात असताना या पुलाच्या खालील भागाचे प्लास्टर कोसळून पडत आहे. हे पुल वाहतूकीस धोकादायक बनले असल्याचे येथील स्थानिक कैलास पाटील यांनी सांगितले.
या पुलाशेजारीच नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाचे 80 टक्के काम पूर्ण झालेले आहे. गेल्या सहा वर्षांपासून या पुलाचे काम थांबलेले आहे. पुलाच्या एका बाजूची जमीन ही वनजमीन असल्याने या पुलाचे काम थांबविण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम थांबले असल्याचेही बोलले जात आहे.
◾या पुलाच्या एका बाजुच्या भरावाची जागा ही वनविभागाची असल्याने त्यांनी हरकत घेतल्याने काम थांबले आहे.
— अनिल भरसड, प्रभारी उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा
◾ गेल्या सहा वर्षांपासून काम बंद असलेल्या या पुलाच्या बांधकामातील उघड्यावर असलेल्या लोखंडी सळ्यांना गंज लागलेला आहे. उर्वरित या पुलाच्या बांधकामांसाठी या सळ्यांचा वापर करु नये.
— आरिफ पटेल, स्थानिक रहिवासी मनोर ता. पालघर.