◾भात उत्पादक शेतकरी आला मेटाकुटीला
पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या वादळी पावसाने पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. सद्या पाऊस निघून गेला असला तरी, शेतामध्ये भरलेले पाणी अजुनही कमी झालेले नसल्याने शेतामध्ये पिकून आलेल्या भाताची कडपे शेताबाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना तिप्पट मजुरी खर्च करावा लागत आहे. या वाढीव खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत.
वादळ वा-यासह झालेल्या परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील विशेषतः वाडा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणी केलेले भात पिक काही शेतकऱ्यांचे वाहून गेलेले आहे. काहींचे संपूर्ण भात पिक शेतातच कुजून गेले आहे. तर काही भात पीकांच्या दाण्यांना शेतातच कोंब फुटले आहेत.
ब-याच शेतकऱ्यांच्या शेतात परतीच्या पडलेल्या पावसाचे पाणी अजूनही सुकून गेलेले नाही. परतीच्या पावसामुळे कापणी करता न आल्याने ही पीके शेतातच गळून चालली आहेत. शेतात अजुनही पाणी असल्याने कापणी करुन भाताची कडपे कशी सुकावायची या चिंतेने येथील शेतकरी ग्रासलेले आहेत. नाइलाजाने अधिक मजूर कामाला बोलावून शेतातील पाण्यातून आजुबाजूच्या मोकळ्या जागेत ही कडपे सुकविली जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना तीन पटीने अधिक मजुरीसाठी खर्च करावा लागत आहे.
◾कनसरी आमुची धनसरी
शेतात साचलेल्या पाण्यात भातपीक कुजून गेलेले असतानाही या कुजलेल्या भाताच्या कडपांना शेतकरी पाण्याबाहेर काढून मोकळ्या जागेत सुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण नष्ट झालेल्या या पिकापासून काहीही हाती येणार नाही, हे माहिती असतानाही शेतकरी असे का करतोय, असे मौजे पीक येथील दमयंती दामोदर पाटील या शेतकरी महिलेला विचारले असता, कनसरी आमुची धनसरी आहे, निसर्गाच्या कोपात तिची अशी झालेली अवस्था आमच्या डोळ्यासमोर पहावत नाही, म्हणूनच पाण्याबाहेर काढून कनसरी सुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
◾ भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत, उत्पादन खर्चा इतकी नुकसान भारपाई मिळावी
— शाम माधव पाटील, शेतकरी, शिलोत्तर , ता. वाडा.
◾ पीककर्ज न घेतलेले शेतकरी तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला नाही, अशा भात उत्पादक अपतग्रस्त शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी
— कांतीलाल शेलार, शेतकरी, घोडमाळ, ता.वाडा