◾रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ च्या ‘आशियाना’ प्रकल्पाचा शुभारंभ
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: घरकुल योजना राबवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असते ज्यासाठी वर्षाला हजारो घरे विविध योजनांद्वारे उभारली जातात. शासनाकडून दिला जाणारा निधी मात्र अनेकदा अपूर्ण पडत असल्याने योजना पूर्णत्वास जात नाही किंवा लाभार्थ्यांना पदरमोड करून घराची उभारणी करावी लागते. रोटरी क्लबने हीच अडचण लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यात घरकुल उभारणीत 70 हजारांचे योगदान देऊन ‘आशियाना’ या नव्या योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ग्रामीण भागात प्रधान मंत्री आवास योजना, आदिम आवास योजना, शबरी आवास योजना व रमाई आवास योजना अशा विविध योजनांद्वारे घरकुल उभारणी केली जाते मात्र अनेक समस्यांमुळे आजही कित्येकांची घरे पूर्णत्वास गेलेली दिसत नाहीत. रोटरी क्लब नेहमीच ग्रामीण जनतेच्या समस्या निवरणावर काम करतांना दिसत असून आता घरकुल योजनेत आपले योगदान देण्यासाठी ‘आशियाना’ या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा तालुक्यातील बोरांडे व चेंदवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
शासनाकडून मिळणारे 1 लाख 32 हजार ज्यात रोटरी क्लब 70 हजार अदा करून जमा झालेली रक्कम 2 लाख 2 हजार लाभार्थ्यांच्या नावे जमा करणार. एक ठेकेदार या घराची उभारणी करणार ज्यात शौचालयासह उत्तमरीत्या घर पूर्णत्वास नेणार आहे. या उभारणीवर रोटरी क्लब चे अभियंता तसेच प्रशासकीय अधिकारी देखरेख करणार आहेत.
रोटरी क्लब सध्या 50 ते 200 व त्यानंतर 500 घरांच्या उभारणीचा टप्पा पूर्ण करणार असून घरांच्या उभारणी नंतर आरोग्य व शिक्षण याबाबत भरीव कामगिरी करणार असल्याचे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुनिल मेहरा यांनी भूमिपूजन प्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाला रोटरीचे सेक्रेटरी रफिक लुलानिया, जि. प. पालघरचे प्रकल्प प्रमुख माणिक दवे, वाडा गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के, आशियाना प्रकल्पप्रमुख राज खोसला, शैलैश माहिमतुरा, दिलीप परमार, सुबोध बोहरा, वाडा अध्यक्ष मिलिंद बागुल , संस्थापकीय अध्यक्ष शशांक ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.