◾सावरे गावातील टोकर कला केंद्रातील आकाशकंदीलांना राज्यासह परदेशातून मागणी
पालघर दर्पण: नविद शेख
मनोर: आदिवासी बहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाने हस्तकलेतून बांबूचा (टोकर)वापर करून तयार केलेल्या आकाशकंदीलांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. बारा प्रकारच्या आकाशकंदीलांना संपूर्ण महाराष्ट्र तसेच परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे. अडीच महिन्यांपूर्वी मोजकेच आकाशकंदील तयार करून आपल्या ग्रामपंचायत हद्दीत विक्री करण्याचा उद्देश बाळगून कामाला लागलेल्या विनोद वनगा यांच्या हस्तकलेला मिळू लागलेल्या प्रतिसादामुळे फोन बंद ठेवण्याची वेळ आली आहे.सावरे एम्बुर ग्रामपंचायत हद्दीतील सासे पाड्याचे नाव बांबुच्या आकाशकंदीलांमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि विदेशात पोहोचले आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाही वनगा यांच्या कलेची दखल घेतली आहे.
सावरे गावातील कलाशिक्षक विनोद वनगा यांना लहानपणा पासून हस्तकलेची आवड होती. त्यामुळे शाळेत असताना बांबू आणि गवताच्या ताटरापासून विविध वस्तू तयार करून शिक्षक आणि मित्रांना भेट स्वरूपात देत असत. आपल्यातील कलेला वाव मिळावा म्हणून त्यांनी बारावी नंतर वसई विकासिनी संस्थेत कलाशिक्षण घेतले. त्यानंतर दुर्वेसच्या जिल्हा परिषद शाळेत काही वर्षे अंशकालीन कलाशिक्षक पदाची नोकरी केली. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात घर चालवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे रोजंदारी तसेच तारापूर एमआयडीसी मध्येही काम केले.परंतु हातातील कला साद देत असल्याने त्यांनी सावरे परिसरातील शाळा सजावट, शाळा रंगवणे, कार्टून काढणे आदी कामे करण्यास सुरुवात केली. त्यातून आपल्या संसाराचा रहाटगाडा हाकत होते.दरम्यानच्या काळात ते बांबू पासून पेपर वेट, इमारतीची आणि घराची प्रतिकृती असे भेट देण्यासाठी वापरात येणाऱ्या वस्तू तयार करण्याचे काम सुरूच होते.
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून टाळे बंदी लागू करण्यात आली होती. या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले.आदिवासी आणि दुर्गम भागातील आदिवासींच्या रोजगारावरही मोठा परिणाम झाला होता. गणेशोत्सवा नंतर दिवाळी सणानिमित्त बांबू पासून आकाशकंदील तयार करून आपल्या गावातच त्यांची विक्री करण्याचा विचार विनोद वनगा यांनी महेंद्र हाडळ आणि बंदु मोहनकर या मित्रांसमोर बोलून दाखवला होता. मित्रांच्या पाठबळावर बाराशे रुपयांच्या गुंतवणूकीतून वनगा यांच्या शेतातील घरात काम सुरू करण्यात आले होते.महिनाभरात दोन कामगारांच्या साहाय्याने बारा प्रकारचे दोनशे आकाशकंदील तयार झाले होते.त्यानंतर तयार आकाशकंदीलांच्या विक्रीची समस्या निर्माण झाली. यावर वनगा आणि त्यांच्या मित्रांनी आकाशकंदीलांचे फोटो त्यांच्या किंमतीसह सावरे टोकर कला केंद्राच्या नावाने गावातील व्हाट्सएप ग्रुप आणि फेसबुक शेअर केले होते. सुरुवातीला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परंतु सावरे टोकर कला केंद्रातील आकाशकंदीलांचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर मागणीत वाढ होण्यास सुरुवात झाली.आणि आकाशकंदीलांच्या खरेदीसाठी लोकं सावरे गावातील सासे पाड्यातील टोकर कला केंद्राचा शोध घेत येऊ लागले. मागणी वाढल्याने कला केंद्रातील कामगारांची संख्या वाढून आजमितीला वीस कामगार आकाशकंदील तयार करण्याचे काम करीत आहेत.
बांबू पासून तयार केलेल्या आकाशकंदीलांचा उत्तम दर्जा,टिकाऊपणा आणि माफक किंमतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र,गुजरात राजस्थान आणि विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे.हाताने तयार होत असल्याने दिवसभरात फक्त पंधरा आकाशकंदील तयार होतात,मागणी पेक्षा कमी आकाशकंदील तयार होत असल्याने वनगा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपले फोन बंद करण्याची वेळ आली आहे.नोव्हेंबर महिन्याच्या बारा तारखेपर्यंत ऑर्डर बुक झाली आहे.हस्तकलेला मिळालेल्या प्रतिसादामुळे वनगा यांना मोठा हुरूप आला असून दिवाळीनंतर बांबू पासून पेपर वेट,फोटो फ्रेम,वाल सिलिंग,फुलदाणी,क्रिकेटचे चषक आणि शोभिवंत वस्तू तयार करण्याचे काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.वारली पेंटिंग पासून प्रेरणा घेत आदिवासी कला आणि संस्कृती आकाशकंदील आणि इतर वस्तूंमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.