◾ कंडेन्सर मध्ये वायूचा दबाव वाढल्याने झाला स्फोट; स्फोटात एक कामगार जखमी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका औषधाचा कच्चा माल बनविणाऱ्या कारखान्यात गुरूवारी सकाळी स्फोट झाला. कंडेन्सर मध्ये वायूचा दबाव वाढल्याने झालेल्या स्फोटात एक कामगार जखमी झाला आहे. याच उद्योजकांच्या इतर कारखान्यात देखील महिनाभर अगोदर स्फोट झाल्याची घटना घडली असल्याने कामगरांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्स प्लाँट नं. टी- 150 या औषधाचा कच्चा माल बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला आहे. गुरुवारी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. स्फोटात याठिकाणी काम करत असलेला कामगार अभय सिंग हा गंभीरपणे भाजून जखमी झाला असून त्यांच्यावर बोईसर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या कंडेन्सर मध्ये दवाव वाढल्याने तो फुटल्याची प्राथमिक माहिती कारखान्याच्या व्यवस्थापकाने सांगितल्या नुसार दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस उपस्थित होते. मात्र अपघाताचे नेमके कारण काय आहे याबाबत साशंकता व्यक्त केली जात असून परवानगी नसलेले उत्पादने घेतली जात असल्याचा संशय उपस्थितांन कडून व्यक्त केला जात होता. परिणामी कारखाना सुरक्षा विभाग व इतर यंत्रणेच्या तपासा नंतर स्फोटाचे कारण समोर येण्याची शक्यता आहे