◾ सरावलीच्या सरपंचा सह 15 सदस्यांवर कारवाई होण्यासाठी केला जातोय विलंब
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: ठेकेराला पाठीशी घालणाऱ्या सरावली ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाईचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून दडवून ठेवण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या भक्कम व राजकीय वरदहस्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या बोगस कामांन कडे जिल्हा परिषद प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गटाराचे दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेराला पाठीशी घालणाऱ्या सरावलीच्या सरपंच सह 15 सदस्यांवर कारवाई वर्षे उलटून गेले तरी झालेली नाही. मात्र त्याजागी एखादी लहान ग्रामपंचायत असती तर कारवाई काही महिन्यातच झाली असती असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीने केलेल्या निकृष्ठ दर्जाचे गटाराचे काम उघडकीस आले होते. याबाबत तक्रार झाल्यानंतर बांधकाम तोडण्यात आले होते. ग्रामपंचायत हद्दीतील घोडीपूजा भगवान नगर भागात बांधण्यात आलेल्या गटारांचे बांधकाम निकृष्ट असल्याचे उघड झाल्यानंतर ठेकेदारावर कारवाई होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने मासिक सभेत बेकायदेशीरपणे ठराव घेतला होता. पदाचा गैरवापर करून घेतलेल्या ठरावामुळे ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी, सरपंच लक्ष्मी चांदणे व 15 सदस्यांन विरोधात ग्रामपंचायत सदस्य शिमला निषाद यांनी 18 जून 2019 रोजी गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. मात्र वर्षे उलटून गेले तरी नोटीस बजावण्याच्या पलिकडे कोणत्याही प्रकारची कारवाई गटविकास अधिकारी पालघर यांनी केली नव्हती. याबाबत तक्रारदार यांनी अनेकदा हेलफाटे मारल्या नंतर 9 जुलै 2020 मध्ये पालघर गटविकास अधिकारी यांनी साधारण एक वर्षाच्या कालावधी नंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर यांच्या कडे अहवाल सादर केला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील चार महिने अहवाल कोकण विभागीय आयुक्त यांच्या कडे पाठविण्यासाठी विलंब केल्याचे समोर आले आहे.
सरावली ग्रामपंचायतीच्या भगवान नगर येथे ग्रामपंचायतीच्या नागरी सुविधा फंडातून 9 लाख 26 हजार 276 अंदाजपत्रक बनवून गटारांचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता यांनी जाहीर करत संपूर्ण गटारांचे बांधकाम तोडून टाकण्यात आले होते. दाखल केलेल्या तक्रारी नुसार पंचायत समिती कडून ग्रामपंचायतीला पत्र आले असता सरावली ग्रामपंचायतीमध्ये आले असता 29 जुलै 2019 रोजी सरपंच यांनी मासिक सभेत ठराव घेऊन ठेकेदारावर कारवाई करू नये असा ठराव मंजूर करून घेतला होता. यामुळे सरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्या विरूद्ध कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र सरावली भगवान नगर येथे बांधलेले निकृष्ट दर्जाचे गटार या कामाची देखरेख करणाऱ्या अभियंतावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या कामाची कोणत्याही प्रकारची देखरेख पंचायत समिती बांधकामा विभागाकडून केली जात नाही. एखाद्या विषयावर तक्रार केल्यानंतरच विषय उघड झाल्यानंतर कारवाईचा बडगा उगारून अधिकाऱ्यांना वाचविले जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
◾ग्रामपंचायतीच्या 17 सदस्या पैकी 16 सदस्यांनी व ग्रामविकास अधिकारी यांनी मान्यता दिली होती. आपल्या पदाचा गैरवापर करून ठेकेदाराला पाठीशी घातल्या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली असून सरपंच लक्ष्मी चांदणे, उपसरपंच मनिषा घरत, सदस्य अशोक शाळुंके, विजय घरत, हिम्मत पठाण, सचिन पाटील, मुकेश घरत, प्रफुल्ल घरत, दिनेश संखे, स्मिता राऊत, प्रेमा माच्छी, मिलिंद यादव, दिपा राऊत, कांचन सहानी, निलकमल धोडी व मिथिला घरत अशा सर्वांवर ग्रामपंचायत अधिनियम कलम (39)1 नुसार पदावरून काढण्याची कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद पालघर यांच्या कडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
◾ सरावली ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई बाबत अहवाल विभागीय कोकण आयुक्त यांच्या कडे पाठविण्यात आलेला आहे.
— टी. ओ. चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर