पालघर दर्पण : प्रतिनिधी
वाडा: करोना या संसर्गजन्य आजाराने सर्वच लहान, मोठ्या उद्योग, व्यवसायांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. बांधकाम व्यवसायही ठप्प झाल्याने त्याचा परिणाम विट उत्पादकांवर झाला आहे. या व्यवसायात असलेल्या अनेक तरुणांनी विट व्यवसाय बंद करून भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.
बांधकाम व्यवसायात काम करणारे बहुतांशी कारागिर व मजूर हे परप्रांतीय आहेत. करोनाच्या भितीमुळे परप्रातिय कारागिर, मजूर हे गावी गेलेले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची अनेक बांधकामे ठप्प झाली आहेत. सद्या करोनामुळे आलेल्या कठीण परिस्थितीत नविन घरे विकत घेण्यासाठी ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. यामुळे विटांना अजिबात मागणी नाही. गतवर्षी तयार असलेल्या विटा लाखोंच्या संख्येने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नव्याने या व्यवसायात पैसे गुंतवले तर मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागेल या भितीने अनेकांनी हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई सारख्या जागतिक बाजारपेठेचा फायदा अन्य जिल्ह्यांतील शेतकरी घेत असताना दिसुन येत आहेत. पालघर जिल्ह्यातील तरुणांनीही शेतीकडे वळावे यासाठी वाडा तालुक्यात वैतरणा शेतकरी स्वंयसेवी व शांतीदुत भाजीपाला उत्पादक या संस्थेचे प्रयत्न सुरु आहेत. वाडा, विक्रमगड तालुक्यातील अनेक तरुण भाजीपाला, कलिंगड, पंपई लागवड तसेच फुलशेती कडे वळू लागले आहेत.
वाडा, विक्रमगड तालुक्यातील अनेक तरुणांनी अधिनुक तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला शेतीची लागवड केली आहे. यामध्ये काकडी, कारली, टाॅमेटो तर काही तरुणांनी कलिंगड, पंपई या फळ पिकांची लागवड केली आहे. व्यवसायात बदल केल्याने तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाल्याने या करोनाच्या महामारीतसुद्धा तरुणांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
◾ विकेल ते पिकेल हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य वाटल्यानेच आम्ही तरुणांनी व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतला.
— जयेश गोळे, शेतकरी जामघर, ता. वाडा