◾ ताप तपासणी केंद्र व कोविड तपासणी केंद्रात प्रवेश करताना नागरिकांचे आरोग्य धोक्यात; मुख्य प्रवेशद्वारात टाकला जातो कचरा
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: करोनाचे रुग्ण लवकरात लवकर समजावे यासाठी सुरू केलेल्या ताप तपासणी केंद्राचा परिसर अतिशय गलिच्छ झाला आहे. टीमा हाँल येथे सुरू असलेल्या तपासणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचा ठिग पाहावयास मिळत आहे. सरावली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अवधनगर भागातील अनधिकृत उभारण्यात आलेल्या वस्तीतला कचरा याठिकाणी रस्त्यावर त्यातल्या त्यात तपासणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकला जातो. तरी देखील आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाने देखील दुर्लक्ष केले आहे.
बोईसर परिसरासह बाजूला असलेल्या अनेक गावातील नागरिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी ताप तपासणी केंद्रात येत असून करोनाची लक्षणे असलेल्या नागरीकांची कोविड तपासणी याठिकाणी केली जाते. तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या टीमा हाँल याठिकाणी हे केंद्र गेल्या अनेक महिन्यांन पासून सुरू करण्यात आले आहे. याच तपासणी केंद्राच्या बाजूला असलेल्या अनधिकृत वस्तीतला कचरा येथील बेजबाबदार लोक चक्क आपल्या घरातील कचरा कोविड तपासणी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर टाकतात. यामुळे याभागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून कोविड तपासणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्याची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य अधिकच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
करोनामुळे स्वच्छतेचे महत्त्व दाखविणारे फलक अनेक ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी लावले होते. ग्रामपंचायतीने देखील मोठ्या प्रमाणात खर्च यासाठी केला होता. मात्र ज्याठिकाणी करोना रुग्णांची तपासणी केली जाते याच ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने ग्रामपंचायतीचे स्वच्छता अभियान चव्हाट्यावर आले आहे. गेल्या आठवड्या पासून पडलेला कचरा ग्रामपंचायत उचलत नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले असून यावर आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्याची तपासणी करणारे तपासणी केंद्र आता येथील घाणेरड्या वासामुळे त्रासदायक ठरू लागले आहे.