पालघर दर्पण: वार्ताहर
नालासोपारा: विरार रेल्वे स्थानकाबाहेर पूर्वेकडे तसेच पश्चिमेकडे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. लोकल येण्या जाण्याच्या वेळेला तर ही वाहतूक कोंडी आणखी वाढते. अनेकदा ही वाहतूक कोंडी अर्धा तासांहून अधिक वेळ असते. त्यामुळे प्रवाश्यांना या नाहक त्रासाला सोमोरे जावे लागत आहे.त्यामुळे या वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.
विरार रेल्वे स्थानकाबाहेर दररोज हजारो प्रवासी ये जा करत असतात .कोरोनाच्या पाश्वभूमीवर महिला आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांकरताच लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक स्थानकांबाहेर प्रवासीयांची गर्दी ही अत्यंत कमी आहे परंतु विरार रेल्वे स्थानकाबाहेर हे चित्र उलटेच आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत तुम्हाला येथे वाहतूक कोंडीच पाहायला मिळेल .प्रवासीयांची गर्दी नसतानासुद्धा फक्त वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी होते.
कोरोनाच्या काळात अनेक लोकांची कामे बंद झाली त्यामुळे अनेकांनी रिक्षा व्यवसायाला स्वीकारले.परंतु अनेक रिक्षा चालक हे विना परवाना रिक्षा चालवत आहेत. त्यामुळे विरार स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात रिक्षा दिसून येत आहेत.त्यामुळे नागरिकांना रिक्षा मधून आपली वाट शोधावी लागत आहे.
◾नो पार्किंगमध्ये वाहनांची पार्किंग
विरार स्थानकाबाहेर होणाऱ्या वाहतूक कोंडीचे आणखी एक कारण म्हणजे अवैधरित्या रस्त्यावर केले जाणारे पार्किंग. विरार स्थानकांबाहेर काही मिनिटांच्या अंतरावरच पे एन्ड पार्क ची सोय आहे तरी सुध्दा अनेक वाहन चालक हे रस्त्याच्या कडेला नो पार्किंग बोर्ड असतानासुद्धा आपले वाहन पार्क करून निघून जातात . अनेक दुचाकी ह्या महिना महिनाभर रस्त्याचा कडेला उभ्या असतात त्यामुळे या अवैध पार्किंगवर वाहतूक पोलीस लक्ष का घालत नाही असा प्रश्न प्रवासी करत आहेत .त्याच बरोबर उरलेल्या जागेमध्ये फेरीवाल्यांची आपले बस्तान बनवले आहे .त्यामुळे लोकांना फिरण्यासाठी जागाच उरली नाही आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर काही योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी प्रवासी नागरिक करत आहेत.