◾प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष पथक तारापूर मध्ये दाखल असताना देखील रात्रीच्या वेळी सोडले जाते रासायनिक सांडपाणी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर येथील उद्योजकांवर लावलेल्या 160 कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाई च्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष पथक तारापुर मध्ये गेल्या काही दिवसांपासून दाखल आहे. या पथकाकडून कारखान्यातुन बाहेर पडणारे रासायनिक सांडपाण्याचे नमुने गोळा करू नये म्हणून अनेक कारखानदारांनी सांडपाणी साठवण्याची युक्ती अवलंबिली आहे. हे दूषित सांडपाणी नंतर अंधाराच्या वेळेत निर्जन ठिकाणी किंवा बंद उद्योगाच्या मार्फत सोडण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांमधील जलप्रदूषणाचे प्रमाण शोधण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष पथक दाखल झाले आहे. या पथकामार्फत सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व इतर सुमारे साडेसहाशे उद्योगांमधील नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे असे पथक दाखल होताना या पथकाकडून सांडपाण्याच्या दर्जा व्यवस्थित नसल्यास कारवाई होण्याची भीती पाहून अनेक उद्योजकांनी आपले उत्पादन बंद असल्याचे भासविले जात आहे. परिणामी कारखान्यातुन निघणारे सांडपाणी एखाद्या टाकीत साठवून नंतर ते दूषित सांडपाणी रासायनिक टँकरच्या माध्यमातून वाहतूक करून इतरत्र पाठवण्याचे कारस्थान सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
एस झोन मधील अशाच एका बंद असलेल्या कंपनीमध्ये जी झोन मध्ये असलेल्या एका बड्या उद्योजका कडून हे घातक रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याठिकाणी असलेल्या सांड पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले होते. त्यामुळे तारापूर मधील एका मोठ्या उद्योग समूहाची असल्याचे उघडकीस येत असून हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यातच गुरुवारी 12 नोव्हेंबर रोजी पुन्हा सकाळच्या वेळी एस झोन मध्ये पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारात पिवळसर रंग असलेले रासायनिक सांडपाणी वाहत असताना दिसले. यामुळे येथील बड्या उद्योजकांने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नेमका कोणता दबाव आणला याबाबत चर्चा तारापूर मध्ये सुरू आहे.
◾सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळीत तपासणी
गेल्या सलग दोन-तीन वर्षांपासून दिवाळीच्या सुमारास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष पथक दाखल होत असल्याचे दिसून आले आहे. काही उद्योजक बाहेर गावाहून येणार्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संगनमत करून सांडपाण्याच्या ऐवजी निखळ पाण्याचे नमुने देत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एकीकडे अनेक उद्योगांचे पाण्याचे नमुने नियमनाच्या मर्यादेत येत असताना सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मात्र आम्लयुक्त पाणी किंवा अपेक्षित दर्जाच्या सांडपाणी अपेक्षा खराब झाल्याचे सांडपाणी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही बडे उद्योग या सा-यातून स्वतःची सुटका करून घेत असल्या तरी मध्यम व लघु उद्योजकांना अशा पहाणी चा फटका बसताना दिसून येत आहे.
◾सांडपाणी प्रक्रिया केंद्र कमी क्षमतेचे तरीही पाणीपुरवठा कपातीकडे दुर्लक्ष
राजकीय सांडपाणी प्रक्रिया न करताच अनेकदा सोडून दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या यातच राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर येथील सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र परिस्थिती मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा नाही याचे कारण देखील तसेच असून 25 एमएलडी क्षमता असलेल्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात 42 एमएलडी पेक्षा अधिक अधिक सांडपाणी येते. 25 एमएलडी सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता असताना तारापूर मधील उद्योजकांना अधिकचा पाणीपुरवठा का केला जातो असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय हरित लवादाने सुध्दा कारखान्यांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा मध्ये कपात करण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असताना दिसून येते.