◾ दुकानदारांन कडून रस्त्याच्याकडेल फेकला जातो कचरा; बोईसरमध्ये कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र यंत्रणेची कमतरता
पालघर दर्पण: शिवानी रेवरे
बोईसर: सध्या करोनाचे संकट लक्षात घेता परिसरात जास्तीत जास्त स्वच्छता राखणे गरजचे आहे. मात्र बोईसर मध्ये दिवाळीत दुकानदारांन कडून मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर फेकण्यात आला होता. तसेच काही लोकांन कडून देखील रोजच कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याने व त्याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यातच काही भागात पडून राहणाऱ्या कचऱ्या मुळे घाणेरडा उग्र दुर्गंधी येत आहे.
बोईसर येथील तारापूर रस्त्याच्या कडेला बोईसर, भीमनगर, चित्रालय, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग आढळून येतात. बऱ्याचदा मोकाट फिरणारी गाई-गुरे ढिगाऱ्याच्या ठिकाणी येऊन उच्छाद मांडतात. त्यामुळे संपूर्ण कचरा रस्त्यावर येत असल्याने वाहन चालकांना देखील त्रास होतो. बोईसर मधील ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे रोगांना आमंत्रण देत असून करोना महामारीच्या काळात अधिक धोकादायक ठरणारे आहे.
देशभारात जरी सुका व ओला कचरा वेगळा ठेवणे ही संकल्पना राबवली असली तरी बोईसर मध्ये त्याचा नामोनिशाण पाहायला मिळत नाही. केंद्र व राज्य सरकारद्वारे स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना राबवण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील करण्यात आले. मात्र तरी देखील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वातच नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बोईसरमध्ये सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी हिरव्या व निळ्या रंगाचे डबे कुठेच ग्रामपंचायतींनी ठेवले नसल्यामुळे नागरिकांना रस्त्याच्याकडेला कचरा टाकण्याची सवय लागली.
◾ बेशिस्त पणे काही लोक रस्त्याच्या कडेला कचरा टाकताना आढळल्यावर ग्रामपंचायतींकडून ठोस कारवाई करण्यात येत नसल्यामुळे बोईसर येथील रस्त्याच्याकडेला कचरा टाकण्यात येतो. या साऱ्या हलगर्जीपणामुळे प्रदूषण व पर्यावरण सौंदर्यहानी असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. बोईसरमध्ये कचरा व्यवस्थापन ही गंभीर बाब बनली असून त्यामुळे बोईसरमध्ये दररोज निघणाऱ्या कचऱ्याचे ग्रामपंचायतींनी योग्य व्यवस्थापन करावे अशी मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.