◾तिळगांव मधील शेतकऱ्याच्या दोन हजार भाताच्या भाऱ्यांना आग
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: तालुक्यात भाताच्या भाऱ्यांना आगी लावण्याचे सत्र सुरूच असुन गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील तिळगांव येथील एका शेतकऱ्याच्या दोन हजार भाताच्या भाऱ्यांना आग लावली. या आगीमुळे या शेतकऱ्याचे साडे तीन लाख रुपयांचे भात जळून खाक झाले आहे. तसेच बुधवारी तालुक्यातील मांगरुळ येथील एका आदिवासी शेतकऱ्याच्या भाताच्या भाऱ्यांना आग लावली होती. आजच्या या दुसऱ्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
या वर्षीच्या खरिप हंगामात करोनाच्या संकटावर मात करून शेतकऱ्यांनी भात पिकाची लागवड केली. पीक हातातोंडाशी आलेले असतानाच परतीच्या पावसाने अर्धे अधिक पीक उध्वस्त केले. जे काही हाती आले त्याची झोडणी करण्यासाठी खळ्यावर आणुन ठेवले आहे. दिवाळीचा सण असल्याने झोडणीचे कामे पुढे ढकळले आहेत.
येत्या काही दिवसांत झोडणी करण्यासाठी तिळगांव येथील शेतकरी अविनाश पाटील हे मजुरांच्या शोधात असतानाच आज गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या खळ्यावर आणुन ठेवलेल्या दोन हजार भाताच्या भाऱ्यांना अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली. या आगीत पाटील यांचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाटील यांनी अज्ञात इसमा विरोधात वाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.