हत्या की आत्महत्या नागरिकांमध्ये चर्चा; मोक्ष मिळावा या भावनेतून या तिघांनी हा प्रकार केल्याचा पोलिसाचा प्राथमिक अंदाज
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: शहापूर तालुक्यातील खर्डी येथील जंगलात तीन तरुणांनी गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत खर्डी व शहापूर मध्ये खळबळ माजली आहे. हा प्रकार आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत तरुणांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. तर मोक्ष मिळावा या भावनेतून या तिघांनी हा प्रकार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याला हा प्रकार शुक्रवारी दुपारी आढळून आला. त्यांनतर या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना देण्यात आली. येथील एका मोहाच्या झाडाला तीन तरुणांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत शुक्रवारी (20 नोव्हेंबर) दुपारी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना तालुक्यातील खर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या चांदे गावानजीकच्या जंगलात उघड झाली.
नितीन भेरे (वय-३५, रा. शहापूर), महेंद्र दुभेले (वय-३०, रा. खर्डी) आणि मुकेश घावट (वय-२२, रा. चांदा, खर्डी) अशी मृतांची नावे आहेत. यामधील दोघेजण सख्खे मामा-भाचे आहेत. तिघा मृत तरुणांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दरम्यान गेल्या 14 नोव्हेंबर पासून हे तिन्ही तरुण बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात दिली होती. हा प्रकार आत्महत्या की हत्या हे संशयास्पद असुन जादुटोण्याच्या प्रकारावरुन हा प्रकार घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. तर यातील मयत नितीन भेरे यास मंत्र तंत्राचे आकर्षण होते. त्याच्या घरातील एका खोलीत अनेक देव देवतांचे फोटो व तंत्र-मंत्र करण्याचे साहित्य आढळून आले आहे.
◾ दिवाळीच्या दिवशी हे तिघेही तरुण गायब झाले होते. दिवाळीच्या अमावस्येला मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो या समजूतीने या तरुणांनी हे कृत्य केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.