◾पालघर दर्पणच्या तक्रारी नंतर एस झोन मधील कारखान्यांची तपासणी; आरती ड्रग्स कारखान्यातील घातक रसायनाची एस झोन मध्ये विल्हेवाट?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची तारापूर मधील प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी सुरू असताना देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण सुरूच आहे. याबाबत पालघर दर्पणने अनेकदा वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला आहे. यातच सोमवारी दुपारी देखील एस झोप मध्ये सोडलेल्या रासायनिक सांडपाण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी तेथील कारखान्याची तपासणी करून रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत.
राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर येथील उद्योजकांवर लावलेल्या 160 कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाई च्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष पथक तारापुर मध्ये गेल्या काही दिवसांपासून दाखल आहे. मात्र तरीही औद्योगिक क्षेत्रातील एस झोन मधील एका बंद असलेल्या कारखान्यातुन जी झोन मध्ये असलेल्या एका बड्या उद्योजका कडून हे घातक रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे याअगोदर देखील पालघर दर्पण मध्ये प्रसिद्ध झाले होते. असाच प्रकार सोमवारी पुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालघर दर्पण टिमने याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत व उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर हे त्यांच्या टीम सोबत घटनास्थळी दाखल झाले.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागातील एस झोन मधील पावसाळी पाणी निचरा करणाऱ्या नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतले. यावेळी काही अंतरावर असलेल्या एस 47 या रासायनिक कारखान्याची तपासणी केली असता नाल्यात सोडलेले रसायन हे सारखेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्स या कारखान्यातील हे रसायन टँकरने येत असल्याचे चौकशी मध्ये समोर आले असून कारखान्यांची तपासणी सुरू असताना आरती ड्रग्स कारखान्याचा एक अधिकारी त्याठिकाणी उपस्थित होता. याअगोदर जी झोन मधून एका बड्या कारखान्यातुन हे रसायन येत असल्याचे पालघर दर्पण मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमी मध्ये म्हटलं होत आता त्या वाक्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. स्थानिक पातळीवर क्षेत्र अधिकारी हे गेल्या अनेक महिन्यांन पासून एस झोन मधील प्रदूषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. यातच आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾ राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर मधील आरती ड्रग्स या कारखान्याला कोट्यवधी रूपयाचा दंड ठोठावला आहे. तरी देखील या उद्योजका कडून वारंवार प्रदूषण सुरूच आहे. जी झोन मध्ये असलेल्या कारखान्यातुन घातक रसायन हे टँकरने एस झोन मध्ये असलेल्या कारखान्यात सोडले जात आहे.
◾ औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी वाहुन नेणारी वाहिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत आहे. तरी देखील या वाहिनीला असलेल्या चेंबरला होर पाडण्यात आला आहे. यामुळे वाहिनीत सोडलेले रसायन पावसाळी नाल्यातून निघून जाते.
◾ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत ज्यावेळी एस 47 या कारखान्यात तपासणी साठी आले असता. तुषार नामक एका व्यक्तीने राजेंद्र राजपूत यांना वरिष्ठ पातळीवरून एक फोन लावून दिला त्यानंतर काही वेळातच राजपूत हे त्याठीकाणाहुन निघून गेले. याबाबत अधिक माहिती साठी राजेंद्र राजपूत यांना संपर्क साधून प्रतिक्रिया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी आपण बातमी लावु नका आम्ही योग्य ती कारवाई करतो व मला कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. असे उत्तर देत अधिक बोलण्यास नकार दिला.