श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती करणारे भक्तशिरोमणि संत नामदेव महाराज ! खूप लहान असतांना संत नामदेव यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले ‘आज तू देवाला प्रसाद दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखविला नाही, तर देवापुढे वाट बघत बसले की, केव्हा हा खाईल ! बाल नामदेवाच्या भोळ्या भावाला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’, या ओवीतून संत नामदेव यांच्या भक्तीभावाचा स्तर लक्षात येतो. एकदा एका कुत्र्याने पोळी पळवली. त्याला ती कोरडी खावी लागू नये, म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे गेले. सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणार्या संत नामदेवांना त्या कुत्र्यातही विठ्ठलाचे दर्शन झाले होते.
संत नामदेव महाराजांनी जीवनभर भगवंताच्या नामाचा प्रसार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांचे अनुमाने २५०० अभंग असलेली अभंगगाथा प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंगरचना (अनुमाने १२५ पदे) केली. त्यातील साधारण ६२ अभंग ‘नामदेवजी की मुखबानी’ या शीख पंथाच्या ‘गुरुग्रंथ साहेब’मध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार आणि चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी आणि तीर्थावळी या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वर यांचे चरित्र सांगितले आहे.
शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥
एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं नका ॥२॥
संसारीं असावें असोनि नसावें । कीर्तन करावें वेळोवेळां ॥३॥
नामा म्हणे विठो भक्ताचिये द्वारीं । घेऊनियां करीं सुदर्शन ॥४॥
भावार्थ : ८४ लक्ष योनींनंतर जिवाला मनुष्यजन्म मिळतो, पण त्या वेळी चुका झाल्या की, पुन्हा फेरा पडतो. त्यामुळे या जन्मातच आत्मारामाची (ईश्वराची) ओळख करून घ्या ! संसारात रमण्यापेक्षा त्यात असूनही नसावे आणि सतत नामजप करावा. भक्ताच्या द्वारी त्याचा उद्धार करण्यासाठी विठ्ठल उभाच आहे.
दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ॥१॥
विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ॥२॥
भक्तिमुक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिति निरंतर वळगणें ॥३॥
नामा म्हणे मना धरीं तूं विश्वास । मग गर्भवास नहे तुज ॥४॥
भावार्थ : हे मना, जरी तू दाही दिशा धावलास, तरी जन्म-मृत्यूचे फेरे काळाच्या अंतीही तुला सुटणार नाहीत. विठ्ठलाच्या नामावर दृढ श्रद्धा ठेव ! हेच नाम संसाररूपी मृगजळ नष्ट करून भक्ती, मुक्ती आणि सिद्धी हे निरंतर तुझ्यापुढे हात जोडून उभ्या रहातील. तू विश्वास ठेव, मग तुला गर्भवास (पुनर्जन्म) नाही.
संत नामदेवांनी समाधी घेतलेली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नामदेव पायरी आहे. आपला अहं कधीच वाढू नये, म्हणून संत नामदेव भगवंताच्या चरणीच विलीन झाले.
संकलक : सौ. नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था