◾3 किलोमीटर रस्त्यांचे काम स्थानिकांच्या विरोधामुळे रखडले; हजारो वाहनांची वळदळ असलेल्या रस्त्याकडे प्रशासनाचे देखील दुर्लक्ष
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार मुख्य रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम गेल्या पाच वर्षापासून पुर्ण झालेले नाही. काही भागातील रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला स्थानिक लगतच्या जागा मालकांनी विरोध केल्याने हा रस्ता अपुर्ण अवस्थेत राहिलेला आहे. परिणामी यामुळे अपुर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे व बेसुमार वेगाने चालवल्या जाणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटल्यामुळे अनेकदा अपघात देखील झाले आहेत. मात्र तरीही स्वतःच्या फायद्यासाठी काही राजकीय मंडळी रस्त्याच्या कामात खोडा घालत असले तरी महाराष्ट्र विकास महामंडळ देखील अशांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तारापूर औद्योगिक क्षेत्रापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या 16 किलोमीटर लांबीच्या बोईसर चिल्हार रस्त्याचे काम पाच वर्षापूर्वी हाती घेतले होते. बोईसर चिल्हार रस्त्या लगत असलेल्या स्थानिकांच्या जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संपादित करून मोबदला देण्यात आला होता. मात्र त्या जागेचे सातबारे उतारे फेरफार झाले नसल्याने रस्त्याचे काम सुरू होताच जमीन मालकांनी वाढीव मोबदल्याची मागणी करत रस्त्यांची कामे अनेकदा कामे बंद पाडली होती. यामुळे या रस्त्यांचे बांधकाम हे अधिकच लांबणीवर गेले. यातच वेळोवेळी स्थानिक राजकीय मंडळींनी आर्थिकदृष्टीने या रस्त्यावर अनेकदा आंदोलन निवेदनांचे नाट्य केले. मात्र शेकडो बळी जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाचा तोडगा काढण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधींंनी पुढाकार घेतला नाही.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमीन मालकांच्या मोबदल्या बाबत कोणत्याही प्रकारची सकारात्मक भुमिका देखील आजवर घेतलेली नाही. यातच रेंगाळत चाललेल्या रस्त्याच्या कामाचा तोडगा काढत ठेकेदारांने शक्कल लढवत ज्यांची जागा बाधित झाले आहे त्याला स्वतः कडील प्रति गुंंठा तिन हजार व स्थानिक पुढाऱ्यांना वेगळे पँकेज देवुन खालच्या पातळीवर समझोता करून देण्यात आला. यानुसार अनेक भागातील कामे मार्गी लागली मात्र नागझरी नाका येथील काही मंडळींनी ठेकेदारा कडून वाढीव तडजोड व्हावी यासाठी आजवर एक फुट देखील काम होऊ दिले नाही. महत्त्वाचे म्हणजे याच नागझरी नाका येथे मोठ्या प्रमाणात राज्य मार्ग असलेल्या या रस्त्यांच्या दुतर्फा नियमबाह्य बांधकामे केली असुन रस्त्या बाबत नियमानुसार जागा देखील सोडलेली नाही. असे असले तरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणाच्या दबावाखाली येवून अशा महाशयांवर कारवाई बाबत प्रयत्न करत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
◾ वाहतुकीचे नियम धुडकावून वाहने सुसाट
बोईसर चिल्हार मुख्य रस्त्यावर औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतूक करणारी वाहने बेसुमार वेगाने चालवली जात असल्याने अशा वाहनांचे नियंत्रण सुटून अनेकदा मोठमोठे अपघात झाले आहेत. मालवाहू वाहनांच्या चाकाखाली येवून अनेक दुचाकी स्वारांनी आपले जीव गमावले असून अपघातांचे प्रमाण अधिक वाढले आहे.