◾ तहसीलदार यांचे खदानी बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील बेकायदेशीर खदानी सुरू; स्थानिक अधिकारी घेतले झोपेचे सोंग
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर तालुक्यातील बोईसर पुर्वेकडील असलेल्या अनधिकृत खदानींना महसूल विभागाने पुन्हा सुरू करण्यासाठी मोकळीक दिली आहे. काही दिवसांपूर्वी याभागातील अनधिकृत सुरू असलेल्या खदानींचा विषय पुढे आल्यानंतर पालघर तहसीलदार यांनी नाईलाजाने सर्व खदानींचे उत्खनन बंद करण्याचे आदेश काढले होते. मात्र प्रांत अधिकारी यांनी नागझरी येथील एका खदानीला परवाना दिल्याने येथील बेकायदेशीर खदानींनी देखील उत्खनन सुरू केले आहे. महत्त्वाचे म्हणजे बेकायदेशीर उत्खनन सुरू असताना देखील बोईसर विभागाच्या महसूल अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
बोईसर पुर्वेकडील नागझरी, लालोंडे, निहे, किराट व गुंदले या संपूर्ण भागात नियमबाह्य खदानी सुरू करण्यात आल्या आहेत. खनिकर्म विभागाचे नियम डावळून महसूल विभाग अशा खदानींना नियमांना बगल देत खोदकामाची परवानगी देत आले आहेत. नागझरी येथील सर्वे नंबर 150 ही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पणे खदानींचे खोदकाम करण्यात आल्याचे वृत्त अनेकदा प्रसिद्ध झाले होते. या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत खदानी खोदकाम सुरू असले तरी याठिकाणी असलेले तलाठी, मंडळ अधिकारी अशा खदानींवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. यातच सर्वे नंबर 150 मध्ये सुरू केलेल्या खदानी कडे स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष हे फक्त आर्थिक दबावामुळे केल्याचा आरोप नागरीकांन कडून केला जात आहे. मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या खदानींकडे दुर्लक्ष होऊच कसे शकते असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
नागरिकांच्या तक्रारी नंतर देखील स्थानिक अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर खदानींन कडे सुरूवातीला दुर्लक्ष केले होते. पालघर तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देवून येथील खदानींचे मोजमाप होईपर्यंत खदानी बंद ठेवण्याबाबत कळविले होते. तसेच नागझरी भागातील खदानी बंद करण्यात आल्या होत्या. मात्र येथील काही खदान मालकांनी प्रांत अधिकारी पालघर यांच्या कडून स्वामित्वधनाचा परवाना आणल्याने आजूबाजूला असलेल्या सर्व बेकायदेशीर खदानी देखील पुन्हा जोमाने सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे एक अधिकारी खदानी कारवाई बाबत अहवाल जरी देत असला तरी दुसरा अधिकारी स्वामित्वधनाचा परवाना देतो यामुळे बेकायदेशीर खदानींना मोकळे रान मिळाले आहे. प्रांत अधिकारी पालघर यांच्या कडून जरी एकाद दुसऱ्या खदानीला परवानगी दिली असली तरी स्थानिक अधिकारी मात्र प्रांतांनी खदानीना परवानगी दिली असल्याची बतावणी करत आहेत.
◾नागझरी येथील सर्वे नंबर 150 मध्ये बेकायदेशीर खदानी सुरू करण्यात आली असताना देखील स्थानिक अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई त्याठिकाणी करत नाही. सर्वे नंबर 150 च्या बाजूला असलेल्या खदानीच्या स्वामित्वधन परवाना घेवून येथील बेकायदेशीर उत्खनन केलेला दगड वाहतूक केला जात आहे.
◾ नागझरी येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वे नंबर 150 मधील शेतजमीन वाटप करण्यात आली होती. मात्र याठिकाणी वाटप केलेल्या जमीनींची हद्दनिश्चत करण्यात आली नव्हती. हद्दीचा वाद हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना काही स्थानिकांंनी याभागात बेकायदेशीर खदानी गेल्या अनेक वर्षांपासून खोदकाम सुरू केले होते. शेतकऱ्यांनी तक्रारी करून देखील स्थानिक मंडळ अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयात तक्रारी केल्या नंतर व याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बोईसर मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमीन सरकार जमा करण्याचा प्रस्ताव पाठवु आपले अंग वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
◾नागझरी भागातील एका खदानीबाबत याअगोदर स्वामित्वधनाचा भरणा करण्यात आला होता म्हणून त्यांना परवानगी दिली आहे. इतर कोणत्याही खदानींना परवानगी देण्यात आलेली नाही. सर्वे नंबर 150 मधील शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जागेची शेतकऱ्यांनी मोजणी बाबत शुल्क भरणा केल्यानंतर मोजमाप बाबत तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील.
— धनाजी तोरस्कर, प्रांत अधिकारी पालघर