◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस झोनचा केमिकल झोल सुरूच; तारापूर मधील सर्वात प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चालढकल
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बडे उद्योजकांचे नियंत्रण प्रदूषण निमंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांन वर असल्याने येथील रासायनिक प्रदूषण रोजच सुरू आहे. सोमवारी एस झोन मधील कारखान्यांची तपासणी केल्यानंतर त्याच भागात पुन्हा रासायनिक घातक सांडपाणी सोडल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणालाही भय उरलेले नसल्याचे दिसून आले. रासायनिक घातक सांडपाणी सोडणाऱ्या बड्या उद्योजकाला राजकीय दबावामुळे पाठीशी घातले जात असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागातील प्लाँट नंबर एस 47 या रासायनिक नावापुरती सुरू दाखवलेल्या कारखान्यात आरती ड्रग्स या कारखान्यातील घातक टाकावू रसायन नियमबाह्य पणे आणले जाते. त्यानंतर हे रसायन प्रक्रिया करण्याच्या नावाखाली तसेच वाहिनीत सोडून दिले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आले होते. सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी स्वतः या कारखान्यांची तपासणी केली होती. कारखान्यात आढळून आलेले रसायन व पावसाळी पाणी वाहणाऱ्या नाल्यात सापडलेले रसायन सारखेच असल्याने निष्पन्न झाले होते. कारखान्यांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर वरिष्ठ स्थरावरून आलेल्या दुरध्वनी नंतर प्रादेशिक अधिकारी त्याठीकाणाहुन काही वेळात निघून गेले व इतर अधिकाऱ्यांनी घातक रसायनाचे नमुने घेतले होते. मात्र बुधवारी पुन्हा त्याच भागात कारखान्यांने रसायन सोडल्याचा प्रकार पुन्हा समोर आला असताना देखील कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
तारापूर मधील प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी गेल्या महिन्याभरापासून सुरू करण्यात आली आहे. लहासहान कारखान्यांना वेठीस धरले जात असले तरी बड्या उद्योजकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मोकळीक देत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्स या औषधाचा कच्चा माल बनविणाऱ्या कारखान्यात होणाऱ्या सर्वात जात प्रदूषणामुळे याअगोदरच राष्ट्रीय हरित लवादाने त्याला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातच एस 47 या कारखान्यात विल्हेवाट लावण्यासाठी येणारे रसायन हे आरती ड्रग्स कारखान्यातुन येत असताना देखील आरती ड्रग्स कारखान्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी दोन दिवस उलटून देखील करण्यात आलेली नाही. यामुळे अशा प्रदूषणकारी उद्योजकांना प्रदूषण नियंत्रण मंडळच पाठीशी घातल असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
◾ राष्ट्रीय हरित दवादाने येथील प्रदूषणकारी कारखान्यांना 160 कोटीचा दंड ठोठावला असला तरी प्रदूषणकारी कारखान्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर झालेली नाही.
◾ एस 47 या कारखान्यात येणारे आरती ड्रग्स येथील रसायन याबाबत आरती ड्रग्स कारखान्यावर काय कारवाई प्रस्तावित केली याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना संपर्क साधला असता त्यांनी एस 47 या कारखान्यावर कारवाई सुरूवातीला केली जाईल. असे उत्तर देत आरती ड्रग्स कारखान्यावर कारवाई बाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.
◾एस झोन मध्ये कारखान्यातुन सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाणी बाबत नमुने घेण्यात आले असून ज्या कारखान्यातुन रसायन येत होते त्या कारखान्यावर देखील कारवाई केली जाईल. कारवाई मध्ये कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही.
— मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर