पालघर दर्पण : प्रतिनिधी
मुंबई: करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे देशातील नागरिक आता करोनावर मात करणाऱ्या लसीच्या प्रतीक्षेत आहे. ही लस पुणे, अहमदाबाद व हैद्राबाद या तीन ठिकाणी तयार होत असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही ठिकाणी पाहणी करण्यासाठी जाण्याचा दौरा आखला आहे.
देशामध्ये करोनाची लस तयार होत असलेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पंतप्रधान रवाना झाले आहेत. सर्व प्रथम अहमदाबाद पुढे हैद्राबाद व पुणे असा दौरा आखला आहे. करोनाच्या लसीच्या प्रगतीबाबत व तेथे असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे. अहमदाबाद मधील झायडस बायोटेक पार्क, पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि हैद्राबाद येथील बाजार बायोटेक या कंपन्यांमध्ये लसीच उत्पादन घेण्यात येत आहे.
अहमदाबाद व हैदराबाद नंतर पुण्यात नरेंद्र मोदी ४:३० च्या दरम्यान पोचतील व एक तासांचा काळ व्यवस्थित करणार असून लासीची साध्य स्थिती, त्याचे उत्पादन व वितरण व्यवस्था याचा संपूर्ण आढावा घेणार आहेत. अहमदाबाद मध्ये
झायडस कॅडीला या संस्थेकडून तयार होणारी जायकोव-डी लसीचा आढावा घेतला असून पंतप्रधान पुढच्या दौऱ्यावर आहेत.
■ पुण्यातील दौऱ्यात मुख्यमंत्री व राज्यपाल नाही…
पंतप्रधान राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असतात. मात्र या दौऱ्या दरम्यान पंतप्रधात पुण्यात येणार असले तरी मुख्यमंत्री व राज्यपाल दौऱ्यात उपस्थित नसणार आहेत. पुण्यात अगदी कमी वेळासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून लगेच परतणार असल्याने मुख्यमंत्री व राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असे पंतप्रधान कार्यालयाकडून कळविण्यात आले. या सुचनेमुळे मुख्यमंत्री व राज्यपाल दौऱ्यात उपस्थित राहणार नाही.