◾ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; चित्रालय भागातील अनधिकृत बांधकामाकडे मात्र दुर्लक्ष
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर शेकडो अतिक्रमणे उभी राहिली आहेत. मात्र वर्षातून एकदा होणाऱ्या कारवाईत एकदोन अतिक्रमणावर कारवाई केली जात असून इतर अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शुक्रवारी फक्त तिन धाब्यांचे शेड तोडण्यात आले आहेत. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
तारापूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या हद्दीतील तिन ढाब्यांच्या वाढीव शेडवर जेसीबी फिरवला आहे. येथील जाणता राजा, रोशन धाबा व रोनक धाबा अशा धाब्यांच्या वाढीव शेडवर कारवाई करण्यात आली. औद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी कारवाई साठी येणार याअगोदरच तिनही ठिकाणी असलेल्या धाब्यांचे पत्रे धाबा मालकांनीच खाली उतरवले होते. विशेष म्हणजे त्यांच्या बाजूला असलेल्या इतर बांधकामाकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दुर्लक्ष केल्याने आमच्या प्रमाणे इतर बांधकामावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. चित्रालय येथील भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने काही वर्षांपूर्वी बाजारपेठेसाठी बैठी गाळे बांधले होते. मात्र येथील लोकांनी त्यावर अनधिकृत बांधकाम करून मोठमोठी दुकाने व आँफिस उभारली असून गेल्या 10 वर्षांपासून देखील अशा अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत बांधकामा मध्ये कारखाने, टपऱ्या व अनेक हाँटेलच्या वाढीव बांधकामाचा समावेश आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई साठी याठिकाणी ठेका दिला जात असून वर्षाला लाखो रूपयाचा खर्च दाखवला जातो. मात्र फक्त एखाद दुसऱ्या बांधकामावर तुटपुंजी कारवाईचा दिखावा केला जात आहे. स्वयमघोषीत सामाजिक कार्यकर्ते एखाद्या बांधकामावर कारवाई व्हावी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडे तक्रारी दाखल करतात. शेकडो बांधकामे उभी राहिली असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी फक्त निवडक अनधिकृत बांधकामावर कारवाई करून कारवाईत दुजाभाव दाखवत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केलेल्या कारवाईत नेमके कोणाचे पितळ पांढरे झाले हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
◾ तक्रारी येत असल्याने अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल.
— संदीप बडगे, उप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूर