◾ अथांग समुद्रात अनुभवाच्या जोरावर काढला बेपत्ता बोटीचा शोध; तिन दिवसापासून बेपत्ता असलेले मच्छीमार सुखरूप परतले
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: सातपाटी बंदरातून चार मच्छीमारसह मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बोटीचा यशस्वी शोध लावून त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात सातपाटी येथील सहा धाडसी मच्छीमार तरुणांना यश मिळाले आहे.
समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ले अथवा संशयित हालचालीवर लक्ष पुरविण्यासाठी आम्ही सक्षम असलो तरी आमचे खरे डोळे हे समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारच असल्याचा पुनरुच्चार संरक्षण यंत्रणांनी अनेक वेळा केला आहे.ह्या देशाच्या संरक्षण यंत्रणांचा विश्वास सार्थ करून दाखविला तो सातपाटी मधील सहा धाडसी मच्छीमार तरुणांनी.गुरुवारी सकाळी सहा वाजता समुद्रात मासेमारीला गेलेली अग्निमाता ही छोटी बोट(डिस्को) आणि त्यावरील चार मच्छीमार तीन दिवस झाले तरी परत किनाऱ्यावर न आल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाची घालमेल त्या सहा तरुणांना बैचेन करीत होती. मनात नानाविध चांगल्या-वाईट विचाराने त्या कुटुंबियांच्या महिला वर्गाचा आक्रोश त्या तरुणांच्या मनाला चटका देत असल्याने त्या सहा तरुणांनी समुद्रात त्यांचा शोधासाठी जाण्याचा निश्चय केला.
कोस्ट गार्ड,नेव्ही,सागरी पोलीस ठाणी,जिल्हा यंत्रणा एव्हडी मोठी यंत्रणा त्या बोटीचा शोध घेत असताना त्यांचा शोध लागत नसल्याने शेजारी राहणाऱ्या ऋषी जयप्रकाश मेहेर(वय36 वर्ष),तुषार रमेश तांडेल(38),भारत महादेव पागधरे(48)गुरू गौड(30),प्रियेश देवानंद मेहेर(30)राहुल सुरेश पाटील(32)आदी सहा तरुणांनी एकत्र येत चार बोटीसह शनिवारी सकाळीच समुद्रात आपल्या बोटी सोडल्या. समुद्रात बोटी घातल्या असताना अचानक सोसायट्याचा वारा सुटत मोठ्या लाटा निर्माण झाल्या असतानाही हे सहा तरुण त्या तुफानी लाटांचा मारा सहन करीत संकटात सापडलेल्या आपल्या सहकाऱ्यांचा शोध घेण्याचा उर्मीने पुढची वाटचाल सुरूच ठेवली.
अथांग,विस्तीर्ण अश्या समुद्रात एका छोट्या बोटीचा शोध घेण्याची आव्हान त्या तरुणापुढे असताना त्यांनी समुद्रातील मासेमारीच्या अनुभवाचा वापर करीत दक्षिणेची वाट निवडली.एडवण गावाच्या समोरील समुद्रा समोरून जात असताना वसई तालुक्यातील एका बोटीने काही महत्वपूर्ण दिलेल्या माहितीच्या आधारे आपली दिशा बदलली. आणिN 19°32’2″,E72°36’32” ह्या जीपीएस पॉईंट वर अग्निमाता ही बोट इंजिन नादुरुस्त झालेल्या अवस्थेत लाटावर हेलकावे खात मदतीच्या अपेक्षेने उभी असल्याचे त्यांना दिसले. आपल्या मदतीला आपले गावातील सहकारी आल्याने बोट मालक ज्ञानेश्वर तांडेल ह्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.तात्काळ ह्या बोटीला दोरखंड बांधून भारत पागधरे ह्यांच्या “महालक्ष्मी प्रसाद”IND-MH-6MM-130 ह्या बोटीने अग्निमाता बोट आणि त्यातील चार मच्छीमाराना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळविले.
◾ अथांग अरबी समुद्रातील ते क्षण..
सातपाटी च्या विशाल मित्र मंडळा तील ज्ञानेश्वर माणिक तांडेल हे मालक असलेली आपली अग्निमाता IND MH2 MM 1223 ही बोट घेऊन गुरुवारी सकाळी 6 वाजता समुद्रात मासेमारीला गेले होते.त्यांच्या बोटीत दिलीप माणिक तांडेल,जगन्नाथ लक्ष्मण तांडेल आणि प्रवीण पांडुरंग धनु हे मच्छीमार असून ते दक्षिणेच्या भागात एडवन गावासमोर गेल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. सकाळी मासेमारीला जाऊन संध्याकाळी एक दिवसाची मासेमारी करून पुन्हा किनाऱ्यावर येणारी बोट शुक्रवारीही आली नसल्याने त्या सर्वांचे कुटुंबीय काळजीत पडले होते.ह्या बाबत सातपाटी सागरी पोलिसांना कळविण्यात आल्या नंतर सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर दहाळकर ह्यांनी ह्या बेपत्ता बोटी बाबत कोस्ट गार्ड, नेव्ही,मत्स्यव्यवसाय विभाग,महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आदींसह जिल्ह्यातील 112 किमी वरील सर्व सागरी पोलीस ठाण्याना कळवित स्वतः ह्या घटनेकडे लक्ष पुरवत होते.परंतु तीन दिवस झाले तरी त्या बोटीचा आणि मच्छीमारांचा शोध लागत नव्हता.
बोटीच्या इंजिन मधील क्रांक शॉप तुटल्याने ते अडकून पडल्याचे त्या बोटीतील मच्छीमारांनी सांगितले.आजू बाजूने जाणाऱ्या अनेक बोटींना मदतीसाठी हाका मारूनही कोणी मदतीसाठी धावून आले नसल्याचे एका मच्छीमारांनी सांगून तीन दिवसांपासून अडकलो असताना साधे पिण्याचे पाणी ही दिले नसल्याचे सांगून काही माणसातल्या संवेदना इतक्या बोथट झाल्याचे पाहून रडायला आल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या लहान बोटीत असलेल्या लहान अँकर(लोयली)ला दगडाचे घाटे बांधून एकाच ठिकाणी सुरक्षित राहण्याचे प्रयत्न सोसाट्याचा वारा आणि उधानाच्या प्रवाहाने अपयशी ठरत होते.त्यामुळे आम्ही मदती साठी देवाचा धावा करीत असताना आज आमचे मच्छीमार बांधव मदतीला धावून आले आहेत.