◾लग्न न करता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी घरातून गेल्या होत्या निघून
पालघर दर्पण: वार्ताहर
नालासोपारा: नायगावच्या चिंचोटी परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा गुन्हा शनिवारी वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. अखेर त्या तिन्ही मुली वालीव पोलिसांच्या टीमला तुळजापुरात सापडल्या असून 36 तासांत बेपत्ता तरूणींचा तपास लागला आहे.
नायगावच्या चिंचोटी परिसरातील दळवीपाडा येथील भाबीपाडा चाळीत राहणारे मुन्नासिंग रामधनी चव्हाण (39) यांची अल्पवयीन मुलगी कांचन (12) व तिच्या मैत्रिणी प्रियंका (15) आणि कविता (13) या घरातील कोणालाही शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. शनिवारी घरच्यांनी वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी वालीव पोलिसांनी टीम स्थापन करून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलींच्या तपास करताना एक मोबाईल नंबर पोलिसांना सापडला. त्याच्या डेटावरून पोलिसांनी टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर मुलींना तुळजापूरला सोडल्याची महत्वपूर्ण माहिती मिळाली. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नवले आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस हवालदार तोत्रे आणि कोकणी यांची टीम गेली होती. सदर मुलींचा फोटो घेऊन प्रत्येक ठिकाणी शोधाशोध सुरू केली. या तिन्ही मैत्रिणी एका हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन तिन्ही मुलींना ताब्यात घेतले आहे. एका मुलीने घरातून 27 हजार, दुसऱ्या मुलीने 1 लाख तर तिसऱ्या मुलीने 20 हजार अशी रोख रक्कम घेऊन लग्न न करता पायांवर उभे राहण्यासाठी घरातून जात असल्याची चिठ्ठी लिहून तिन्ही मैत्रिणी निघून गेल्या होत्या. सध्या तिन्ही मुलींना पोलिसांच्या टीमने ताब्यात घेतले असून मंगळवारी रात्री आल्यानंतर त्यांना सुखरूप त्याचा पालकांकडे सोपवण्यात येणार आहे.