◾ दवाखान्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तीन दवाखान्यांचे पदभार
पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: पालघर जिल्ह्यात असलेल्या पशु वैद्यकीय दवाखान्यातील पशु विकास अधिकारी, सहाय्यक पशु विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा वर्षोनुवर्षे भरल्या जात नसल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन ते तीन दवाखान्यांचा पदभार सांभाळावा लागत आहे. वाडा तालुक्यात कार्यरत असलेल्या काही पशु विकास अधिकाऱ्यांनकडे जव्हार, मोखाडा तालुक्यातील दवाखान्यांचा पदभार दिल्याने येथील अनेक दवाखान्यातील सेवा ठप्प होत आहे.
वाडा तालुक्यात एकुण 15 पशु वैद्यकीय दवाखाने आहेत. यामधील काही दवाखान्यातील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांचीही पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ही पदे भरण्यात यावीत अशी मागणी गारगांव गटाच्या रोहिणी शेलार यांनी वारंवार पत्रव्यवहार करुनही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.
वाडा तालुक्यातील 15 पशु वैद्यकीय दवाखान्यातील पशु विकास अधिकाऱ्यांसह विविध पदांवरील एकुण 14 जागा रिक्त आहेत. येथील आठ पशु वैद्यकीय दवाखान्यांत शिपाईच नसल्याने कार्यालयात झाडलोट करण्यापासुन अन्य शिपाईंची कामे येथील पशुधन अधिकाऱ्यांना करावी लागत आहेत. वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना या तालुक्यात कार्यरत असलेल्या पशु विकास अधिकाऱ्यांनकडे जव्हार व मोखाडा तालुक्यातील दोन, दोन पशु वैद्यकीय दवाखान्यांतील पदभार देण्यात आले आहेत.
पशु विकास अधिका-यांकडे अन्य ठिकाणचे पदभार असल्याने येथील दवाखान्यात येणाऱ्या पशु पालकांना आपल्या पशुधनावर कुठलेच उपचार न करता परत जावे लागत आहे. येथील काही शेतकऱ्यांनी भातशेतीला जोड व्यवसाय म्हणुन दुध, पोल्ट्री, शेळीपालन असे व्यवसाय सुरु केले आहेत. अनेकदा हे पशुधन आजारी पडल्यास वेळेवर पशु विकास अधिका-यांशी संपर्क होत नाही. पशु वैद्यकीय दवाखान्यात गेले तर दवाखाने बंद असतात. अशा परिस्थितीत उपचारा अभावी पशुधनाला प्राणास मुकावे लागते. अनेकांना खाजगी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना अर्थिक भुदंड सोसावा लागतो. पशुवैद्यकीय दवाखान्यातील सर्व प्रकारच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी शेलार यांनी केली आहे.
◾पशु विकास अधिकारी यांच्या जागा शासनस्तरावरुन नियुक्त केल्या जातात. व पशुधन पर्यवेक्षकच्या जागा पालघर जिल्हा निर्मिती झाल्यापासून गेल्या सहा वर्षांत जिल्हा भरती झालेली नाही. म्हणुनच या जिल्ह्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे.
— डॉ. अजित हिरवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.