◾क्रशरच्या धुरवडी कडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष; बोईसर पुर्वेकडील नियमबाह्य सुरू असलेल्या दगड क्रशर मशीन प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी फिरकत सुद्धा नाही
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: सुंदर निसर्ग लाभलेल्या बोईसर पुर्वेकडील भाग आजच्या घडीला अतिशय प्रदूषणकारी झाला आहे. पश्चिमेला असलेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे येथे राहणे जिकरीचे झाले असले तरी पुर्वेला असलेल्या दगड खदानींन मुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरी वस्तीत असलेल्या दगड क्रशरच्या प्रदुषणाकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष असून प्रदुषणकारी दगड क्रशरवर कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर करण्यात आली नाही. नियमबाह्य पणे दिवसरात्र सुरू असणाऱ्या क्रशर मुळे नागरीकांचा श्वास कोंढला असुन पर्यावरणाची मोठी हानी याभागात झाली आहे.
बोईसर पूर्वेकडील नागझरी, लालोंडे, निहे, किराट, बोरशेती, गुंदले संपूर्ण भागात 15 हुन अधिक दगड क्रशर मशीन असुन प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही नियम पाळले जात नाही. क्रशर प्रकल्पातुन निघणारे दगडी कण मिश्रित पावडर हवेत मोठ्या प्रमाणात उडत असल्याने याभागातील लांबवर असलेल्या शेतजमीनी, झाडे व नागरी वस्तीत असलेल्या घरांवर दगडाची पावडरचा थर पाहावयास मिळतो. हवेतील धुळीकणामुळे नागरीकांना श्वासनाचे व फुफुसाचे आजारांना सामोरे जावे लागत आहे. येथील नागरीकांनी अनेक वेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करून देखील कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई या प्रदुषणकारी क्रशर मशींनवर करण्यात आली नाही. याउलट प्रदुषण मंडळाने इतर नवीन क्रशर मशींन उभारण्यासाठी हिरवा कंदील दाखवला जात असल्याने प्रदूषणाचा स्थर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार क्रशर मशीन जवळ पाण्याचे फवारे व ज्याठिकाणी दगड पिसला जातो त्याठिकाणी सतत पाण्याचे फवारे लावणे बंधनकारक असते परंतु ही प्रक्रिया खर्चीक असल्याने याकडे सर्वंच जन दुर्लक्ष करतात. यातच क्रशर प्रकल्पा पासुन मुख्य रस्त्यावर जोडणारा रस्ता हा डांबरी किंवा सिमेंट काँक्रीट चा असणे जरूरी असते जेणेकरून वाहने ये जा करत असताना कोणत्याही प्रकारची धुळ उडणार नाही. मात्र नागरीकांच्या जिवावर उठलेल्या क्रशर माफियांनी सर्वंच नियम धुडकावून लावत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेवुन हा गोरखधंदा सुरूच ठेवला असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. गुंदले, नागझरी, लालोंडे भागातील काही क्रशर मशीन अगदी नागरी वस्ती व मुख्य बोईसर-चिल्हार रस्त्यांच्या बाजुला असताना अशा दगड क्रशर प्रकल्पांना परवानगी मिळाली कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागझरी येथील आदिवासी नागरीकांनी या संपूर्ण भागातील दगड क्रशर, खदानी व विषारी वायु सोडणारे डांबर प्रकल्प यांच्या मधुन होणाऱ्या प्रदुषणामुळे हे विनाशकारी प्रकल्प बंद करण्या बाबत तक्रार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या तारापुर येथील कार्यालयात वर्षभरापूर्वी देण्यात आली होती. मात्र येथील अधिकाऱ्यांनी फक्त कारणे दाखवा नोटीस बजावून त्यावरच समाधान मानले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर (2) विभागाकडून प्रदूषणाबाबत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. ज्या पद्धतीने येथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कामकाजामुळे औद्योगिक क्षेत्र काळवंडून गेले त्याच पध्दतीने बोईसर पुर्वेकडील भाग देखील क्रशर उद्योजकांन कडून पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याने मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण सुरू आहे.
◾एकीकडे प्रदूषणाच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे गुंदले व नागझरी येथे नवीन क्रशर प्रकल्पासाठी बांधकामे पुर्ण करण्यात आली आहेत. महसूल विभाग, ग्रामपंचायत व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पणे परवानगी दिल्या जातात. येथील ग्रामपंचायती मध्ये नागरीकांचा विरोध असताना देखील आर्थिक देवान घेवान करून दाखले दिले जात असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
◾बोईसर पुर्वेकडील दगड क्रशर मशीन पासून होणाऱ्या प्रदूषणाची तपासणी सुरू करण्यात येणार असुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
— मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर