पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: रेल्वे रद्द केल्यामुळे पालघरमध्ये संतप्त नागरिकांनी रेलरोको आंदोलन केले आहे. पश्चिम रेल्वेने ३ डिसेंबर पासून डहाणू- विरार आणि डहाणू चर्चगेट लोकलच्या वेळापत्रकात बदल केल्याने सकाळी डहाणू वरून ४ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी पहिली चर्चगेट लोकल बंद करण्यात आली. याचा विरोध दर्शवण्यासाठी पालघर व सफाळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी रेलरोको आंदोलन केले.
रेल्वे रद्द झल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने या विषयावर निवेदन लोकप्रतिनिधींना दिले होते. मात्र यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने आज (बुधवारी) रेल्वे स्थानकांवर रेलरोको आंदोलन करण्यात आले. सर्वप्रथम पहाटे ५:१५ वाजता पालघर स्थानकात प्रवाशांनी चर्चगेटकडे जाणारी लोकल रोखून धरली. पालघरचे आंदोलन मागे घेतल्या नंतर सफाळेला देखील प्रवाशांनी रुळावर उतरून आंदोलन सुरू केले. सफाळेत मुंबईच्या दिशेने जाणारी राजधानी व डहाणूच्या दिशेने जाणारी लोकल रोखून धरली होती. जवळपास सकाळी ७ वाजे पर्यंय हे आंदोल सुरू होते. रेल्वे कडून बदल केलेले वेळापत्रक मागे घेण्यात येईल व ४:४० पहिली चर्चगेट लोकल सुरू ठेवण्यात येईल असे आश्वासन मिळाल्या नंतर सफळे येथील प्रवाशांनी रेलरोको आंदोलन मागे घेतले.