◾ बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर चित्रालय येथे रस्त्यांचे काम सुरू केल्याने नागरिकांची गैरसोय होणार दुर
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर चित्रालय भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हा रस्ता प्रत्येक वर्षीच खराब होत असल्याने त्याबाबत नागरिकांना गैरसोय होत होती. मात्र आता या रस्त्यांच्या कामाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतल्याने नागरिकांंची गैरसोय दुर होणार आहे.
राष्ट्रीय रस्ते विकास प्रकल्पा अंतर्गत बोईसर तारापूर मुख्य रस्त्यांचे कामाचा कार्यारंभ आदेश सन 2018 मध्ये देण्यात आला होता. मिलन बिल्टेक या गुजरात येथील कंपनीला ठेका देण्यात आला होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून चित्रालय येथील रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. नागरिकांना होणाऱ्या त्रासा बाबत अनेकदा वृत्त प्रसिद्ध करून वेळोवेळी या रस्त्यांचा पाठपुरावा केला होता. अखेर रस्त्यांचे काम सुरू झाल्याने नागरिकांन कडून समाधान व्यक्त केले जात आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वरदळ असल्याने काम सुरू केल्यानंतर मोठ्या वाहनांना याठिकाणी प्रवेश दिला जात असल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत आहे. यामुळे रस्त्यांचे काम पुर्ण होईपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.
बोईसर तारापूर रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वटवृक्ष असून रस्त्याच्या उभारणी वेळी झाडे कापली जात आहेत. परंतु याच रस्त्यावर असलेल्या अनधिकृत फेरीवाले व अनधिकृत थाटलेली दुकाने यांना हटवणे गरजेचे असताना देखील त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. हा रस्ता अतिक्रमण हटवून रुंदीकरण झाल्यानंतर बोईसर कडे येणाऱ्या वाहनांना वेळेवर नियोजित ठिकाणी जाता येणार असून वाहतूक कोंडीची समस्या देखील दुर होणार आहे. यापूर्वी रस्ता डांबरीकरण व पावसाळी पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडत होते. मात्र आता उंच होणाऱ्या काँक्रीटीकरण रस्त्यामुळे ही समस्या दुर होणार असून नागरिकांची गैरसोय दुर होणार आहे.