◾बेटेगाव चौकीवरून वाहने पास करायला पैशाची मागणी; वाहने पास करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या पोलिसाला 20 हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: मालवाहू वाहने चौकीवरून पास करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर पोलिसाला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील बेटेगाव चौकीवरून अवजड मालवाहू वाहने पास करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. यामुळे बेटेगाव चौकीवरून वाहने पास करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पैशाच्या आरोपांना या कारवाई मुळे शिक्कामोर्तब झाला आहे.
बोईसर पोलीस ठाण्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने याठिकाणी एखाद्या चौकीला देखील महत्त्व आहे. भंगार वाहतूक व बेकायदेशीर घातक केमिकल वाहने पास करण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे आरोप याअगोदर देखील करण्यात आले होते. बेटेगाव चौकीवरून एका वाहतूकदारांचे अवघड वाहने बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सुरक्षित पणे पास करण्यासाठी पोलीस शिपाई विलास काळे यांनी 3 डिसेंबर रोजी 25 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. यामध्ये तक्रारदार यांच्या सोबत तडजोड करून 22 हजार देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग ठाणे यांच्या कडे दिलेल्या तक्रारी नुसार बोईसर बेटेगाव चौकी येथे सापळा रचून 4 डिसेंबर रोजी पहाटे पोलीस शिपाई विलास काळे यांना 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास मते, सचिन मोरे, तानाजी गायकवाड, संदेश शिंदे व अश्विनी राजपूत या अधिकाऱ्यांनी केलीय.
◾बोईसर बेटेगाव चौकीवरून पैसे घेवून मालवाहू वाहने सोडण्यासाठी लाच घेताना पोलिसांवर शुक्रवारी सकाळी झालेल्या कारवाई नंतर सायंकाळीच्या वेळी एकही पोलिस बेटेगाव चौकी वर वाहने तपासणी करताना बाहेर दिसत नव्हता. यामुळे येणाऱ्या काही काळात तरी बेटेगाव चौकीवरचे वसुली केंद्र बंद असणार हे नक्कीच आहे.