◾सक्षम अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल,वाढीव दर मिळविण्यासाठी शेतकरी आक्रमक
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
मनोर: पालघर तालुक्यातून प्रस्तावित मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे.भूसंपादन प्रक्रियेत संपादित होत असलेल्या जमिनींचा रास्त मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा प्रशासनासोबत संघर्ष सुरू आहे.परंतु पालघर तालुक्यातील जमिनींना कवडीचे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे जाहीर केलेल्या दरापेक्षा अधिक मोबदला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.यासाठी शेतकरी संघर्ष समिती मार्फत शनिवारी (ता.05) नागझरीच्या कुणबी समाज सभागृहात शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग प्रकल्पाविरोधात गेल्या आठ वर्षापासून पालघर तालुक्यात शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा सुरू आहे. याकाळात लोकप्रतिनिधी आणि राजकिय पक्ष शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले नाही. प्रशासनाकडून जबरदस्तीने प्रकल्प रेटून नेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आणि निराशा आहे. सुरुवातीला तत्कालीन सक्षम अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत संपादन होणाऱ्या जमिनीला प्रतिगुंठा सहा ते सात लाख रुपयांचा भाव देण्याचे आश्वासन खोटे ठरले आहे.त्यानंतर अनेक गावांमधील जमिनींना कवडीमोल दर जाहीरकरण्यात आला आहे.मुंबई पासून हाकेच्या अनंतरावर आणि तारापूर औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या भागातील जमिनींना कमी दर जाहीर करण्याचे पाप प्रशासनाने केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे.शेतकऱ्यांना प्रतिगुंठा सात लाख रुपयांचा दर जाहीर करावा तसेच प्रकल्पग्रस्तांचे दाखले शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करून संपादित होत असलेल्या त्यांच्या जमिनींना रास्त दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास शेतकऱ्यांची येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.वेळ पडल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात मागेपुढे पाहणार नाही. शेतकऱ्यांसोबत कमी दराने झालेल्या करारांचे नूतनीकरण करण्याची मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली.
मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांच्या कायम सोबत राहण्याची ग्वाही खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळी दिली.मासवन सारख्या गावाला दिलेला दर तालुक्यातील सर्व गावांना देण्याची मागणी करीत शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये.असा दम खासदारांनी अधिकाऱ्यांना भरला.
मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी पालघर तालुक्यातून संपादित केलेल्या जमिनींना दिलेल्या दरांमध्ये मोठी तफावत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींमध्ये तथ्य आहे.दर वाढवून मिळविण्यासाठी खासदारांनी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करून तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे.शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वैयक्तिक रित्या संपर्क साधण्याचे आवाहन,उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसकर यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विष्णू कडव,पंचायत समिती सदस्य महेंद्र अधिकारी, शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष कमलाकर अधिकारी, रमाकांत सोगले आणि मोठ्या संख्येने प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते.