पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: निसर्गाचा लहरीपणा आता भातशेतीला अधिक संकटात टाकत असून दरवर्षी यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतांना दिसत आहे. भातशेती हा वाडा तालुक्यातील पारंपरिक शेती व्यवसाय असून वडिलोपार्जित चालत आलेली ही रीत मोडायची अजूनही अनेक शेतकरी हिम्मत करीत नाहीत. वाडा तालुक्यात मात्र आता शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची नांदी सुरू झाली असून केळी उत्पादन हा यातीलच एक भाग शेतकऱ्याला आधार देतांना दिसत आहे.
भातशेती ही वाढलेली मजुरी, बियाणे,औषधे व खते यांच्या वाढलेल्या किमती, निसर्गातील बदल व भाताला मिळणारा अल्प व बेभरवश्याचा मोबदला यांमुळे सातत्याने तोट्यात आहे. वाडा तालुक्यात अलीकडे केळी उत्पादन वाढत असून अनेक शेतकरी केळ्याची शेती करण्यात रमल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव येथून आणलेली जी-9, भसराई जातीची रोपं उखळणी करून सऱ्या ओढलेल्या शेतात लावायची ज्यांची किरकोळ देखरेख करून वर्ष भरात एका खोडाला साधारण 28 ते 30 किलो केळ्यांचे उत्पादन हमखास येते.
वाडा तालुक्यात वेफर्स कंपन्या तसेच केळी विक्रेते अधिक असल्याने केळ्याला 9 ते 12 रुपये प्रति किलो इतका मिळतो ज्यातून खर्च वजा करता निम्मे नफा शेतकऱ्याच्या हातात येतो असे आदर्श सतीश पष्टे सांगतात. एकदा उत्पन्न घेतले की पुढील दोन वर्षे अजून उत्पन्न शेतकऱ्याला घेता येते ज्यात खर्चाची रक्कम अधिक कमी होतांना दिसत. वाडा तालुका चारही दिशेला नद्यांनी वेढलेला असल्याने पाण्याची जागा निचऱ्याची जमीन असलेला शेतकरी या उत्पादनात अधिक यशस्वी होतांना दिसत आहे.
केळी, भाजीपाला, फुलशेती यात वाडा तालुकाही अव्वल होतांना दिसत असला तरी अजूनही शेतकरी एकसंघ नसल्याने व्यापारी याचा फायदा घेऊन शेतकऱ्याला गंडा घालतांना दिसतात अशी खंत केळी उत्पादक शेतकरी विलास आकरे यांनी व्यक्त केली.