पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: भाजप सरकारने नव्याने अमलात आणलेली कृषी विधेयके रद्द करा या मागणीसाठी आज पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात पालघरमध्ये समिश्र प्रतिसाद पहावयास मिळाला आहे. ग्रामीण भागात देखील बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून काही भागात बाईक रँली काढण्यात आली होती.
पालघरमधील राजकीय पक्ष व विविध संघटनांनी या बंदला जाहीर पाठिंबा दिला असला तरी सकाळ पासून पालघर शहरातील तीन व सहा आसनी रिक्षा सुरू होत्या,प्रवासी वर्गाची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी वाहतूक सुरू होती. शहरातील दुकाने,व्यापारी,बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवल्या गेल्या.पालघर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याने शहराला छावणीचे रूप आले होते.
बोईसर मध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून बोईसरची बाजारपेठ पुर्ण पणे बंद होती. औद्योगिक क्षेत्रात देखील काही प्रमाणात बंदचा परिणाम जाणवत होता. राजकीय पक्षांनी रँली काढत केंद्र सरकार विरोध घोषणाबाजी केली. बोईसर चिल्हार मुख्य रस्त्यावर नागझरी येथे काही काळ रास्तारोको करण्यात आला होता.
वाडा शहरात देखील बाजारपेठ पुर्ण पणे बंद ठेवण्यात आली होती. बंद यशस्वी करण्यासाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा या प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वाडा तालुक्यात आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या बंदमध्ये वाडा, कुडूस, खानिवली या प्रमुख बाजारपेठांसह गांव पातळीवरील लहान दुकानेही बंद होती.