◾मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले व आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णु सवरा (वय 72) यांचे आज संध्याकाळी उशिरा दुःखद निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांन पासून उपचार सुरू होते.
सन 1990 पासुन ते सन 2014 पर्यंत झालेल्या सहा विधानसभा निवडणुकीत ते सातत्याने निवडून आले होते. सन 1995 च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 1999 रोजी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला. अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली.
सन 2014 मध्ये भाजपा सरकार मध्ये त्यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होण्याचाही त्यांना सन्मान मिळाला. त्यांच्या गोड वाणीने वृद्धांपासुन ते लहान मुलांपर्यंत सर्वांचे परिचित झाले होते. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने एक अजातशत्रू लोकप्रतिनिधी अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती.