◾महिना उलटून जात असला तरी प्रदूषणकारी कारखादार मोकाट; प्रदूषणाच्या नावाखाली लहान उद्योजकांना धरले जाते वेठीस
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रात कारखानदारांना वेठीस पकडत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तळ ठोकून बसले असले तरी बड्या उद्योजकांच्या प्रदूषणकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिक कितीही ओरडले आरोप केले तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आपल्या सोईनुसार प्रदूषणावर नियंत्रण आपण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील पावसाळी पाणी वाहुन नेणाऱ्या नाल्यात रासायनिक घातक सांडपाणी सोडणारा कारखानदार आजुनही मोकाटच असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारखानदारावर मेहरबान असल्याचा आरोप केला जात आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांन कडून घातक रसायन नाल्यात सोडल्या प्रकरणी महिना उलटून जात असतानादेखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागातील प्लाँट नंबर एस 47 या रासायनिक कारखान्यातुन घातक रसायन चोरट्या पध्दतीने नाल्यात सोडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत वृत्त झाल्या नंतर 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी स्वतः या कारखान्यांची तपासणी केली होती. मात्र या प्रदूषणकारी कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे याठिकाणी होत असलेले प्रदूषण अधिकाऱ्यांन समोर उघड झाले असताना देखील कारवाई साठी विलंब का असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे इतर एखाद्या कारखान्यांवर कारवाई करताना वेळेचा देखील विलंब न करता तातडीने कारखाना बंद ची कारवाई प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांच्या कडून केली जाते. असे असले तरी बड्या उद्योजकांंवर कारवाई साठी प्रादेशिक अधिकारी चालढकल करत असल्याचे दिसून येत आहे.
तारापूर मधील आरती ड्रग्स कारखान्यातील रसायन हे एस 47 या कारखान्यात रासायनिक प्रक्रिया करण्याच्या नावाखाली आणले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा चोरटा प्रकार सुरू होता. कारखान्यातुन निघणारे घातक रसायन विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रूपयाचा खर्च वर्षाकाठी येत असल्याने कारखानदारांने एस 47 याठिकाणी एक कारखाना घेवून त्याठिकाणी हे घातक रसायन थेट नाल्यात सोडले जात होते. महत्त्वाचे हे रसायन आरती ड्रग्स या कारखान्यांचे असल्याचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी घटनास्थळी असताना सांगितले होते. मात्र वरिष्ठ स्थरावरून एका राज्यमंत्री दर्जाच्या मंत्र्यांने फोन करून दबाव आणल्याचा प्रकार घडला असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत खातरजमा करण्यासाठी इतर अधिकाऱ्यांना खाजगीत जाऊन विचारणा केली असता त्यांनी दबक्या आवाजात बोलत वरिष्ठ स्थरावरून दबाव असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी प्रादेशिक अधिकारी यांना कारवाई बाबत अहवाल सादर केला होता. तसेच याबाबत उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांना याअगोदरच विचारलेल्या प्रतिक्रिया मध्ये म्हणाले होते की, “एस झोन मध्ये नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाणी प्रकरणी एक अहवाल आल्या नंतर एस 47 या कारखान्यांवर कारवाई केली जाईल. तसेच ज्याठिकाणाहुन हे रसायन येत होते याबाबत देखील कारवाई बाबत अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवला जाईल” असे साधारण 10 दिवसापूर्वी सांगितले होते. याबाबत मंगळवारी तारापूर येथे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना कारखान्यांवर काय कारवाई केली याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत वरिष्ठ स्थरावर अहवाल सादर केला आहे, असे उत्तर देत कारवाई प्रकरणातून अंग काढण्याचा प्रयत्न केला आहे.
◾प्रदूषणाच्या नावाखाली लहान उद्योजकांना धरले जाते वेठीस
दिवाळीच्या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूर मधील कारखान्यांची तपासणी सुरू केली होती. आजवर 100 पेक्षा अधिक कारखान्यांची तपासणी केली असली फक्त दोन कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान लहान उद्योजकांवर कारवाई ची टांगती तलवार दाखवून अनेक गोष्टी पुर्ण केल्या जात असल्याचे काही उद्योकांनी सांगितले आहे. मोठ्या उद्योकांच्या प्रदूषणकडे दुर्लक्ष करून लहान उद्योजकांचे प्रदूषण होत नसले तरी लहान सहान बाबींवर बोट ठेवून कारवाईचा फास आवळला जात असल्याचा आरोप केला जात आहे.