■लसीचा पूर्ण डेटा कमिटी समोर सादर न झाल्याने लस वापरण्यासाठी मंजुरी नाही.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई: कोव्हिड-१९ ही महामारी संपूर्ण देशभरात व्यापली असून त्याची लागण अनेक जणांना झालेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण कोव्हिड-१९ पासून बचाव करण्याऱ्या लसीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र नागरिकांना अजून काही काळ लसीसाठी थांबावे लागणार असल्याचे समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी देखील भारतात लस तयार होत असलेल्या ठिकाणी भेट दिली तेव्हा लवकरच लस उपलब्ध होईल असे सांगितले होते. मात्र लसीसाठी नागरिकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. भारतातील तीन कंपन्यांनी करोना लसीच्या वापरासाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली आहे. त्यावर सेंट्रल ड्रग स्टॅडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी ही भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडिया व फायझर यांच्या करोना लसींच्या डेटा व बाबींची तपासणी केल्या नंतरच लस वापरण्याच्या मंजुरी बाबत निर्णय घेणार आहेत.
बुधवारी घेतल्या गेलेल्या बैठकीत तिन्ही कंपन्यांनी लसीचा डेटा सादर केला नव्हता तसेच फायझर कंपनीने आपल्या डेटासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी त्यांना आणखी काही कालावधी लागणार असल्याचे लिहून दिले त्यामुळे लस वापरण्याच्या मंजुरीबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
लस वापरण्याच्या मंजुरीबाबत निर्णय न झाल्याने अजून एक बैठक होणार आहे. ज्यावेळी लस तयार होत असलेल्या या तिन्ही कंपन्या सेंट्रल ड्रग स्टॅडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशच्या सब्जेक्ट एक्स्पर्टने कमिटीने मागितलेली डेटा कमिटी समोर सादर करत नाही तोपर्यंत लस वापरासाठीच्या मजुरीचा निर्णय घेता येण शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.