■ एसटी चालक व वाहक यांनी तरुणीची पर्स परत केली; पालघर एसटी विभागाने केला दोघांचाही गौरव.
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: येथील स्वारगेट शिवशाही एसटी बसचे चालक बाबासाहेब शेक व वाहक तनवीर राजे यांनी एसटीतून प्रवास करणाऱ्या तरुणीची पैशांची भरलेली पर्स परत केली असून पालघरमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.आजच्या जगात प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
पालघर एसटी डेपो मधून स्वारगेटला जाणारी शिवशाही एसटी बस हे दोघेही घेवून जात असताना बुधवारी ही बस पालघर डेपो हुन अकरा वाजता सुटली. त्यानंतर ठाणे येथून काही प्रवासी चढल्यानंतर बसने पुढील मार्गक्रमण केले. यामध्ये एक तरुणी ठाण्यावरून पिंपरी येथे जाण्यासाठी निघाली होती. तिची साठ हजार रुपये असलेली पर्स ती बस मध्येच विसरली. दरम्यान स्वतःच्या नादात तिने पिंपरी येथे ही पर्स एसटी बस मध्येच विसरून उतरली. एसटी बस स्वारगेट बस डेपोत तोवर पोचली होती.
पालघर डेपोची शिवशाही बस स्वारगेट डेपो पोहोचल्यानंतर चालक शेख व वाहक राजे यांनी एसटीचा दरवाजा बंद करून ते विश्रामगृहात विश्रामासाठी गेले. तेथे विश्राम करीत असताना ही प्रवासी तरुणी त्यांच्याकडे रडतरडत आली व त्यांनी तिची विचारपूस केल्यावर पैसे असलेली पर्स हरवली असल्याबाबत दोघांनाही सांगितले. त्यानंतर तिने बस तपासायला सांगितले. त्यानुसार वाहक राजे यांनी चालक शिंदे यांना ही बाब सांगून बस तपासण्यासाठी पुढे पाठवले. चालक शेख यांनी ही एस टी उघडून एसटीमध्ये तपास केला असता तरुणी बसलेल्य आसनाखाली त्यांना ही पर्स सापडली. कर्तव्य दक्षता व प्रामाणिकपणा दाखवत शेख यांनी ही पर्स आणली व त्या तरुणीकडे सुपूर्द केली.
कावराबावरा झालेली तरुणी पर्स बघताक्षणी शांत झाली व तिने चालक शेख व वाहक राजे या दोघांचेही मनःपूर्वक आभार मानून पुढे निघून गेली. या दोघांनी ही बाब पालघर डेपोला कळवली. पालघर डेपो च्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोघांचे अभिनंदन केले. कर्तव्य दक्षता व प्रामाणिकपणा दाखवून प्रवासीची पर्स परत केल्यामुळे पालघरचे एसटी विभागाचे व्यवस्थापकीय प्रमुख राजेंद्र जगताप यांनी दोघांचाही सत्कार केला.