◾विधानसभेच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिशाभूल करण्याचा प्रयत्न; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व कोलवडे ग्रामपंचायतीने केमिकल माफियाला वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न उघड
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातील रसायन युक्त प्लॅस्टिक व ड्रम धुवून होणाऱ्या प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारी मध्ये ग्रामपंचायतीने घुमजाव केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत लेखी पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देवून आता प्रदूषण होणाऱ्या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम सुरू नसल्याचा उल्लेख असलेले पत्र दिले आहे. मात्र प्रत्येक्षात याठिकाणी रोजच खुलेआम प्रदूषण सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याने तारांकित प्रश्नाला उत्तर देताना कसा बनाव केला जातो हे उघडकीस आले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील राजकीय कारखान्यातुन निघणारा घनकचरा व प्लास्टिक ड्रम औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या लगतच्या कोलवडे येथील शेतजमीनीत धुतले जात असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण होत आहे. यातून निघणारे घातक रसायन नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानुसार कोलवडे ग्रामपंचायतीच्या समितीने 2 नोव्हेंबर रोजी प्रदूषण होत असलेल्या जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. ग्रामपंचायतीने तसेच प्रदूषण विभागाने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे यावेळी निदर्शनास आले होते. यामुळे पर्यावरणाला धोका पोचण्याची शक्यता पाहता तसेच जमिनीमध्ये रासायनिक केमिकल पाण्यामुळे जलस्रोत खराब होण्याची शक्यता असल्याने आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने 4 नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. मात्र याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न सादर झाल्याने याठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू नसल्याचे पत्र ग्रामपंचायतीने दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
कोलवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या तक्रारी नुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील केमिकल माफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नव्हती. याठिकाणी “वाहब” नावाचा एक भंगार व केमिकल माफिया प्रदूषण करत असताना देखील कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई आजवर झालेली नाही. मात्र विधानसभेत तारांकित प्रश्न सादर झाल्यानंतर 4 डिसेंबर रोजी महिनाभरानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी प्रदूषण सुरू असलेल्या जागेवर जाऊन पाहणी केल्याचे पत्रात म्हटले आहे. यानुसार कोलवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर 2 चे उपप्रादेशिक अधिकारी यांना पत्र देऊन त्यामध्ये आपल्या सोबत केलेल्या पाहणी मध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवसाय शेती जागेवर सुरू नसल्याचे पत्र दिले आहे. याठिकाणी प्रत्यक्षात भंगार व केमिकल माफियांचे प्रदूषण सुरूच असताना ग्रामपंचायतीने बनावट पत्र दिले तरी कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोलवडे ग्रामपंचायत हद्दीत शेती भागात केमिकल युक्त प्लॅस्टिक धुवून प्रदूषण सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्या नंतर याभागात जाऊन वस्तुस्थिती पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर 2 चे उपप्रादेशिक अधिकारी दिपक बनसोड यांना विचारणा केली असता. त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार ग्रामपंचायतीची आता नाही, याठिकाणी सुरू असलेले प्लॅस्टिक धुवण्याचे काम बंद असल्याचे उत्तर देत प्रकरणातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत संशय आल्याने अधिक माहिती मिळावी यासाठी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना भेटून ग्रामपंचायतीने केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती घेतल्या नंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विधानसभा तारांकित प्रश्नाला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांन सोबत ग्रामपंचायतीने केलेला बनाव उघडकीस आला असून विधीमंडळाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
◾ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर 2 चे उपप्रादेशिक अधिकारी दिपक बनसोड यांना बातमी बाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी बातमी छापु नका असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांना आपली प्रतिक्रिया काय हे पुन्हा विचारले असता 4 डिसेंबर रोजी प्रत्येक्ष जागेवर जाऊन तपासणी केली असता एक गोडाऊन सुरू होते व दोन भंगार गोडाऊन बंद असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ग्रामपंचायतीने दिलेले पत्र व त्यात उल्लेख असलेला मजकूर खोटा असल्याचा एकप्रकारे खुलासा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत आहे.
◾कोलवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन मोकाशी यांना संपर्क व मोबाईल वर संदेश पाठवून देखील त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तसेच दुपार नंतर पुन्हा प्रतिक्रिया जाऊन घेण्यासाठी संपर्क साधला असता फोन बंद ठेवण्यात आला होता.