पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पिल्लांना जिवंत गाडण्याचा प्रकार पोल्ट्री व्यावसायिकाच्या अंगाशी आला आहे. अमानुष पणे कोंबडी पिल्लांची हत्या केल्याने पशु संवर्धन विभागाने पोल्ट्री मालकाला कारवाईची नोटीस बजावली असुन भारतीय प्राणी संरक्षण कायदा व प्राणी क्रुरता कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
जगभरात करोना व्हायरसची भीती निर्माण झाल्या नंतर सोशियल मीडियाच्या माध्यमातून अफवांच्या चर्चांना उधाण आल आहे. याचा थेट परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला असुन चिकन खाण्याकडे खवय्यांनी पाठ फिरवल्याने चिकन चे भाव बाजारात घसरले आहेत. यामुळे या व्यवसायाला मोठी घरघर लागल्याने याचा धसका घेऊन डहाणू तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक संदीप भाटलेकर यांनी जवळपास नउ लाख उबविलेली अंडी आणि जवळपास पावणे दोन लाख नवजात जिवंत पिल्ल खड्डे खोदून जेसीबी च्या सहाय्याने पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. नवजात जिवंत पिल्लांना पुरल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या समोर आल्यावर संदीप भाटलेकर अडचणीत आले असून पशु संवर्धन विभागाकडून कारवाईची नोटीस बजावत गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.