◾पास्थळ छाया निवास रहिवासी संकुलातील सदनिकेत आढळून आले मृतदेह; घर बंद करून पती झाला अनेक दिवसापासून बेपत्ता
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यातील पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या छाया निवास येथे एका सदनिकेत दोन महिलांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बंद घरातून घाणेरडा वास येत असल्याने नागरिकांनी तारापूर पोलिसांना कळविले होते. पोलिसांनी दरवाजा खोलताच सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले असून संपूर्ण इमारत परिसरात दरवाजा खोलल्या नंतर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.
तारापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पास्थळ येथील छाया निवास रहिवासी संकुलात एक महिला वय वर्षे 48 व तिची मुलगी वय वर्षे 20 आपल्या दुसऱ्या पती सोबत राहत होती. मात्र अचानक बंद झालेले घर व त्याठीकाणाहुन निघु लागलेली दुर्गंधी यामुळे आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी तारापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता. घटनास्थळी तारापूर पोलीस दाखल झाल्या नंतर त्यांनी दरवाजा चे लाँक तोडताच अतिशय घाणेरडा दुर्गंध बाहेर आला. यावेळी इमारती मधील सर्व नागरिक उग्र दुर्गंधी मुळे बाहेर पळाले. या बंद घरात महिला व तिची मुलगी यांचे दोघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडले. तारापूर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदना साठी तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले असून अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कसा झाला याचा उलघडा होणार असल्याचे पोलिसांन कडून सांगण्यात आले आहे.
मृत महिला आपल्या पहिल्या पतीला सोडून छाया निवास येथे दुसऱ्या इसमा सोबत राहत होती. संकुलात असलेल्या सिसीटिव्ही कँमेरा नुसार 6 डिसेंबर 2020 रोजी घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच महिलेचा दुसरा पती गेल्या चार पाच दिवसापासून बेपत्ता असल्याचे समोर येत असून तारापूर पोलिसांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद येत आहे. याबाबत तारापूर पोलीस अधिक तपास करत असून फरार असलेल्या पतीचा शोध घेतला जात आहे.