◾बोईसर येथे वीज तार पडल्याने एक ठार एक जखमी; खांब वाकविणाऱ्या बोरिंग गाडी चालकाला मोकळीक
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: सरावली ग्रामपंचायत हद्दीतील भैयापाडा संतोषी नगर मधील उच्च दाबाची 11 केव्ही फिडर वरील वीज वाहक तार पडल्याने एक जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींवर मुंबई येथील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सरावली संतोषी नगर भागात बोअरवेल ची गाडी गुरूवारी सकाळच्या वेळी विद्युत खांब्याला थोकल्याने येथील विद्युत खांबा वाकला होता. त्या खांब्यांची दुरुस्ती सकाळच्या वेळी करण्यात आली होती. मात्र नादुरुस्त असलेली तार अंगावर पडल्याने गुरूवारी रात्री 10 च्या सुमारास रोहित विश्वकर्मा (22 वर्षे) हा तरुण गंभीर भाजून मृत पावला असून मोहमद शेरीफ (35 वर्षे) गंभीर जखमी झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे वीज वाहत तार जमिनीवर कोसळल्यावर तिला अर्थीन्ग मिळताच वीज खंडित ( फिडर ट्रिप ) होते. परंतु या घटनेत वीज ट्रिप न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली असूूून विद्युत निरीक्षक लवकरच या घटनेची चौकशी करणार असून चौकशी नंतर अपघाताचे निश्चित कारण समोर येणार असले तरी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा मुळे एकाचा बळी गेला आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या खात्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तातडीची मदत म्हणून वीस हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
◾खांब वाकविणाऱ्या बोरिंग गाडी चालकाला मोकळीक
वीज वाहत तार पडल्याची घटना घडली त्याच ठिकाणी गुरुवारी सकाळी एका बोरिंग च्या मोठ्या गाडीने वीज वाहक खांबाला ठोकर दिल्या नंतर ते खांब वाकले होते. त्या वाकलेल्या खांबांच्या जागी नवीन खांब उभे केले. मात्र त्या बोरिंगच्या गाडी चालकाकडून नुकसानभरपाई म्हणून 25 हजार घेतले अशी चर्चा जोरात घटना स्थळी सुरू होती. मग हे पैसे कुणी घेतले, घेतले असतील तर ते वीज वितरण कडे जमा केले का ? तसेच या घटने नंतर नियमाप्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.