■ १३ ते २६ डिसेंबर पर्यंत पालघरमध्ये मनाई आदेश लागू.
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव तसेच २५ डिसेंबर रोजी नाताळ हा सण साजरा होणार आहे. तसेच राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलने व रस्ता रोको करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने १३ ते २६ डिसेंबर २०२० पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यात आलेली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी, पालघर डॉ.किरण महाजन, यांनी पोलीस अधिक्षक पालघर यांच्या कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक १३ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२० या कालीवधीमध्ये शस्त्रे, तलवारी, भाले, दांडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा शारिरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई केली आहे.
तसेच कोणतीही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे. ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे हावभव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक, कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे व लोकात प्रचार करणे. यासाठी देखील प्रशासनाने मनाई केली आहे.
सदरचा आदेश प्रेतयात्रांना लागु नसून तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरीष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक असून अशांना लागु असणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, डॉ.किरण महाजन, यांनी जारी केलेल्या मनाई आदेशा मध्ये नमूद केले आहे.