◾ कारखान्यांच्या बेसुमार वायूप्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष; रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना देखील जाणवतो त्रास
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाइल कारखान्यांच्या वायू प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षभरापासून रोजच याठिकाणी मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वायू पसरलेला दिसून येतो. याचा त्रास रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना व आजूबाजूला असलेल्या गावातील नागरी वस्तींना होत असताना देखील कारखान्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाइल या लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीच मेहरबान असल्याचे दिसून आले आहे. कारखान्यांत लोखंडावर रासायनिक प्रक्रिया करताना त्यातून निघणारा लालसर रासायनिक वायू दररोज दिवसभर मोठ्या प्रमाणात कारखान्यांच्या बाहेर पडतो. कारखान्यात स्कबर यंत्रणा नसल्याने रसायन मिश्रित वायू थेट हवेत पसरतो. यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना त्यांचा त्रास होत असून डोळे चुरचुरणे व श्वसनाचे त्रास रोजच होतात. यातच वायू मध्ये असलेले धुळीकण बाजूला असलेल्या नागरी वस्तीत व सरावली गावातील रहिवासी वस्तीत जावून नागरीकांच्या घरात थर साचतो. नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रदूषणकारी कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेहरबान का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विराज प्रोफाइल कारखान्याला वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपकरणे बसविण्यासाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र कारखानदारांने याकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरूच ठेवले. एकीकडे इतर कारखान्यांवर कारवाईचा बडगा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा कडून उठवला जात असला तरी बड्या उद्योजकांना मात्र कायद्यातील पळवाटा शोधून प्रदूषण करण्यासाठी खुली सुट दिल्याचा आरोप नागरिकांन कडून होत आहे. गेल्या महिन्या भरापासून तारापूरात ठाण मारून बसलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांचे विराज प्रोफाइलच्या प्रदूषणाकडे लक्ष का जात नाही हा मोठा प्रश्न समोर येत आहे.