कमी वेळेत अधिक उत्पन्न देणारी किफायतशीर शेती
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: भातशेतीचे जोखडात अडकून पडलेल्या शेतकऱ्याला लहरी निसर्गही बेजार करीत असल्याने कमी वेळेत अधिक उत्पन्न देणारी नगदी पिके घेण्याकडे वाड्यातील शेतकरी वळलेला पाहायला मिळत आहे. निचोळे गावातील सतीश पष्टे या शेतकऱ्यासह तालुक्यातील जवळपास 400 एकर क्षेत्रात कलिंगड लागवड करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूने सुरू झालेल्या लॉकडाउनने अनेकांना आपल्या शेतीत परतण्यास भाग पाडले असून मोठ्या संख्येने लोकं शेतीकडे वळून नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. एकेकाळी कलिंगड लागवडीत अग्रेसर असलेल्या वाडा तालुक्यात कलिंगड शेती होणाऱ्या नुकसानीमुळे हद्दपार झाली होती मात्र आता तालुक्यातील जवळपास 400 हेक्टर क्षेत्रात कलिंगड लावले गेल्याची माहिती आहे.
निचोळे गावातील आदर्श शेतकरी सतीश पष्टे यांनी आपल्या दीड एकर पडीत क्षेत्रात कलिंगडाची 6 हजार रोपे लावली आहेत. जमीन बनवून मशागत करून सऱ्या पाडण्यात आल्या त्यात मल्चिंग पद्धतीने प्लास्टिक अंथरूण शेणखत आणि अन्य औषधे त्यात देण्यात आली. ठिबक सिंचन असल्याने पाणी देण्याचा प्रश्न मार्गी लागतो शिवाय मल्चिंगने गवत उगवत नसून बाष्पीभवन नीट होऊन झाडाला पुरेशी उष्णता व आवश्यक असलेला थंडावा मिळतो. पष्टे यांना दीड लाखांचा खर्च यासाठी आला असून प्रत्येक झाडाला जवळपास 10 किलो फळ आल्यास व योग्य भाव मिळाल्यास 4 लाखांचे उत्पन्न हमखास येईल असे ते सांगतात.
लांबट आकाराचे शुगरकिंग, गोलाकार असलेले अगस्ती व सागर किंग या विविध गुण असलेल्या जातींना चांगली मागणी आहे. कलिंगड शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ तीन महिन्यात शेतकऱ्याला चांगले उत्पन्न देऊन जाते आणि यामुळेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी यंदा कलिंगड शेतीत रमलेला आहे.
◾नगदी पिकांकडे शेतकरी वळू लागला आहे ही समाधानकारक बाब असून भातशेतीसोबत फळशेती अधिक वाढीस लागायला हवी, कृषी विभागानेदेखील याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असून शेतकऱ्यांनीही अनुदानाच्या भुलभुलैयात न पडता अधिक प्रयोगशील व्हायला हवे.
—- सतीश पष्टे,
आदर्श शेतकरी,निचोळे