◾मनोर पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी दाखवला फरार; राजकीय वरदहस्त असलेला माफिया अजय वर्तकला अखेर पालघर कंट्रोल रूमला दिलेल्या तक्रारी नंतर पालघर पोलिसांनी घेतले ताब्यात
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या धाब्यावर मनोर पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात माफिया राज वाढले आहे. अनधिकृत धंद्यांवर तक्रार होऊन देखील स्थानिक पोलिस दुर्लक्ष करत असल्याने पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातून कारवाई करण्यात आली. चिल्हार फाटा येथे असलेल्या ढाब्यावर छापा मारून गृह विभागाच्या उप अधीक्षकांनी रसायन जप्त करत तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र मनोर पोलीस ठाण्यातून यातील एका ताब्यात असलेल्या आरोपीला फरार दाखविण्यात आले. परंतु पत्रकारांच्या प्रसावधनामुळे हा आरोपी पालघर पोलिसांना पुन्हा ताब्यात घेता आला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढाब्यांवर गेल्या महिना भरापासून जोरदारपणे अनधिकृत धंदे सुरू करण्यात आले होते. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ ढाब्यांवर अनधिकृत धंदे सुरू असल्याची माहिती पुढे आली असताना देखील पोलिसांनी त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता. सोमवारी 14 डिसेंबर रोजी पहाटे पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातील गृह विभागाचे उप अधीक्षक शैलेश काळे यांनी मनोर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत चिल्हार फाट्यावरील दद्दु च्या ढाब्यांवर छापा टाकला होता. यावेळी एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये डिझेल सदृश्य रसायन विक्रीसाठी अवैधरित्या साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले होते. रासायनिक ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवलेला ड्रम जप्त करण्यात आला असून पवन मिश्रा,दिलीप बसवत आणि अजय वर्तक या तीन आरोपींविरोधात मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 285सह 34 आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोर पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र यामधील मुख्य सुत्रधार असलेला अजय वर्तक हा माफियाला गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या गुन्हा फक्त दोन आरोपींना अटक दाखविण्यात आली असून अजय वर्तन हा आरोपी फरार दाखवण्यात आला आहे. मात्र 15 डिसेंबर रोजी मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान हा माफिया चित्रालय येथील सरोवर हाँटेल च्या लाँजिग वेटींग भागात बसलेला दिसून आला. पोलिसांच्या मदतीने फरार असलेला आरोपी काही वेळातच सरोवर हाँटेल च्या बाहेर असलेल्या रिक्षातून अचानक निघून गेला. याबाबत पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना याबाबत माहिती झाल्यानंतर व त्यांनी प्रत्येक्षात खात्री केल्यानंतर त्यांनी लागलीच याबाबत मनोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कोळी यांना दुरध्वनी वरून माहिती दिली. मात्र त्यांनी याबाबत आम्ही तपास करत असून आरोपीला ताब्यात घेवु असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पालघर दर्पण टिमने लागलीच सतर्क होत, रिक्षा थांब्यावर जावून माहिती घेतली असता हा आरोपी पालघरला विशेष रिक्षा करून गेला असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संबंधित रिक्षा चालकाला संपर्क साधून व पालघर पोलीस कंट्रोल रूमला आरोपी व रिक्षा बाबत माहिती दिल्यानंतर पालघर पोलिसांनी काही वेळातच अजय वर्तक या फरार आरोपीला पालघर चार रस्ता येथे सापळा लावून ताब्यात घेतले आहे.
पालघर पोलिसांनी पकडलेला आरोपी अजय वर्तक हा मंगळवारी सकाळच्या वेळी पालघर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या आरोपींना भेटण्यासाठी आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील काही पोलीस कर्मचारी यांनी सांगितले की हा आरोपी सकाळी याठिकाणी आरोपींना भेटण्यासाठी आला होता. यावरून माफिया असलेला फरार आरोपी सहजपणे लाँकअप मध्ये ठेवलेल्या इतर आरोपींना भेटतो म्हणजे कायदा व सुव्यवस्था किती काटेकोर पालघर मध्ये आहे याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. मनोर पोलीस ठाण्यात असलेल्या आरोपीला पोलिसांनी फरार दाखवून मोठी अर्थपूर्ण प्रक्रिया केलेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील सीसीटीव्ही कॅमेरे व संबंधित पोलिसांचे मोबाईल काँल तपासणी करून माफियांना साथ देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र खाल पासून वर पर्यंत हात असलेले माफियांवर व त्याला मोकळीक देणाऱ्या पोलिसांवर पालघर पोलिस अधीक्षक आता काय कारवाई करतात हे पाहणे औचित्याचे ठरेल. झालेल्या प्रकाराबाबत पालघर गृह विभागाचे उप पोलीस अधिक्षक शैलेश काळे यांना संपर्क व मोबाईल संदेश पाठवून देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
◾मी पोलीस ठाण्यात आरोपी ताब्यात घेतले त्यावेळी उपस्थित नव्हतो. गुन्हाचा तपास माझ्या कडे असून यातील दोन आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.
— अमित कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोर