◾तारापूर औद्योगिक क्षेत्रात पाणी टँकर बंदी असताना देखील खुलेआम टँकर सुरू; कारखान्यांना बेकायदेशीर पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर माफियांन कडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांना बेकायदेशीर पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरवर बंदी घालण्यात आली असताना देखील खुलेपणाने कारखान्यांना चोरटा पाणीपुरवठा सुरू आहे. पालघर जिल्हाधिकारी यांनी तारापूर मधील वाढलेले प्रदूषण यासाठी टँकर बंदी बाबत आदेश काढले असले तरी जिल्हाधिकारी यांचे आदेश कागदावरच राहिलेले आहे. यामुळे कागदोपत्री असलेल्या आदेशाची अंमलबजावणी नेहमी मुदत संपल्यावर होणार का असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रदूषणाचा स्थर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील रासायनिक कारखान्यांना त्यांच्या उत्पादनानुसार मंजूर असलेला पाणीपुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून मिळतो. मात्र काही कारखानदार प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन घेत असल्याने ते बेकायदेशीर पण टँकरने चोरटा पाणीपुरवठा घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात टँकरने पाणीपुरवठा करण्यावर बंदी असताना देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने कारखानदारांना मोकळे रान मिळत आहे. येथील काही स्थानिक टँकर माफिया रोजच मोठ्या प्रमाणात टँकरने बेकायदेशीर पणे पाणीपुरवठा कारखान्यांना करत असताना देखील एकाही कारखान्यांवर ठोस कारवाई आजवर झालेली नाही. मात्र आता पालघर जिल्हाधिकारी यांनी आदेश पुन्हा काढल्याने आता कारवाई होईल अशा अपेक्षा असताना देखील औद्योगिक क्षेत्रात टँकर राज सुरूच आहे.
◾ राष्ट्रीय हरित लवादाने जारी केलेल्या निर्देशानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार औद्योगिक वसाहत परिसरात टँकरमधून घातक रासायनिक कचरा तसेच पाण्याची वाहतूक होत असल्याचे नमूद केले होते. राज्याचे मुख्य सचिव यांनी दिलेल्या सूचनेनुसार औद्योगिक परिसरात रात्रीच्या वेळी टँकर बंदी आणण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश काढले होते. 11 नोव्हेंबर 2020 रोजी मुख्य सचिव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत रात्रीच्या वेळेस औद्योगिक वसाहती मध्ये सर्व प्रकारच्या टँकरची वाहतूक बंद करून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती नेमण्याची सुचना करण्यात आली होती. परंतु बैठकीत घेण्यात आलेले निर्णय त्या बैठकी पर्यंतच सिमीत राहिल्याने तारापूरच्या प्रदूषणावर कोणताही बदल झालेला दिसून येत नाही.
◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रात पाम, सालवड, बोईसर याभागातील काही टँकर माफिया बेकायदेशीर पाण्याचा पुरवठा कारखान्यांना करतात. राजकीय पाठबळामुळे प्रशासन देखील त्याकडे दुर्लक्ष करत आले आहे.
◾ पालघर जिल्हाधिकारी यांनी कारखान्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या बेकायदेशीर टँकर वर बंदी घातली त्याच प्रमाणे औद्योगिक क्षेत्र परिसरात रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या टँकरना प्रवेश व वाहतूक बंदी केली असली तरी रात्रीच्या वेळी चोरट्या पध्दतीने टँकर वाहतूक सुरू असते. येथील बेटेगाव चौकी वरून ही बेकायदेशीर वाहतूक होत असताना देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. औद्योगिक क्षेत्रातील एन झोन मध्ये एका रासायनिक कारखान्या बाहेर मोठ्या प्रमाणात रसायन घेवून जाणाऱ्या टँकरची वाहतूक रात्रीच्या वेळी सुरु असते. कारखान्यातील रसायन हे इतर ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी घेवून जात असल्याची माहिती समोर येत आहे.
◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रात गेल्या चार महिन्या पुर्वी बजाज हेल्थ केअर कारखान्यात बेकायदेशीर पणे पाणीपुरवठा करताना टँकर आढळून आला होता. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नोटीस बजावण्या पलिकडे कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. याभागात रोजच टँकरने पाणीपुरवठा सुरू असून एन व जी झोन मध्ये असलेल्या एका बड्या रासायनिक कारखान्यात रोजच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून यासर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
◾कारखान्यांना टँकरने होणाऱ्या बेकायदेशीर पाणीपुरवठ्यावर लक्ष देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांची सर्व भागात रात्री 11 पर्यंत नियुक्ती केली आहे. ज्याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करताना आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
— राजेंद्र अनासने, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूर पाणीपुरवठा विभाग