◾ निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य असल्याबाबत तक्रार दाखल; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातुन संबंधितांना बजावल्या नोटीसा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: नेहमीच नियमबाह्य काम करून वादग्रस्त ठरणाऱ्या सरावली ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक वादग्रस्त ठरली आहे. या निवडणूक प्रक्रियेत नियमांना धुडकावून उपसरपंच निवडून दिल्याबाबत पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरपंच सह निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत सरपंच यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.
सरावली ग्रामपंचायत मध्ये 21 आँक्टोबर 2020 रोजी सरपंच ग्रामपंचायत सरावली यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती. निवडणूक गुप्त पध्दतीने झाली असे भासवून अशोक साळुंके यांना 16 मते मिळुन त्यांचा विजय झाला होता. मात्र यामध्ये निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप करत दोन मते मिळून पराभूत झालेल्या दिनेश संखे यांनी आक्षेप घेतल्याने सरपंच सह सदस्यांना व प्रशासन अधिकारी यांना अडचणीत आणले आहे. निवडणूक अध्यक्ष म्हणून सरपंच लक्ष्मी चांदणे कामकाज पाहत असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नसताना देखील त्यांनी देखील मतदान केले होते. निवडणूक प्रक्रिया करताना सर्व सदस्यांना सभागृह बाहेर काढण्यात आले आणि एक एक सदस्याला सभागृहात घेवून निवडणूक पार पाडण्यात आली होती. तसेच मतदान करताना नोटा हा पर्याय ठेवण्यात आलेला नव्हता.
उपसरपंच निवडणूकीच्या दिवशी निवडणूक शिवाय दुसरे कोणतेही कामकाज ठेवता येत नसताना देखील त्यांनी मासिक सभा ठेवली होती. यामुळे ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर पणे पार पाडली असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे होते. उपसरपंच अशोक साळुंके यांच्या विरूद्ध सरकारी जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचा खटला सुरू असल्याचे नोटीस मध्ये म्हटलं यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 35(3ब) खाली विवाद अर्ज जिल्हाधिकारी यांच्या कडे दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या कडून सरपंच लक्ष्मी चांदणे यांच्या सह इतर 16 सदस्यांना नोटीस बजावून आपले म्हणणे सादर करण्यासाठी सांगण्यात आले आहे. याबाबत 21 डिसेंबर 2020 रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
◾निवडणूक पार पडली त्यावेळी शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्या सह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यातच विरूद्ध उभा असलेला उमेदवार देखील याच पक्षांचा असल्याने त्यावेळी दबावतंत्र वापले गेल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य असल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडून नोटीसा आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व नेत्यांची असलेली उपस्थिती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
◾ वर्षभरात दुसऱ्यांदा कारवाई अहवाल
सरावली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व सरपंच सह 16 सदस्यांवर ठेकेदारा पाठीशी घातल्या प्रकरणी 39(1) नुसार पदावरून काढण्याबाबत अहवाल कोकण विभागीय आयुक्त यांच्या कडे प्रलंबित आहे. भगवान नगर येथील निकृष्ठ गटार काम बाबत ठेकेदारावर कारवाई होऊ नये यासाठी नियमबाह्य ठराव घेण्यात आला होता. याबाबत पालघर जिल्हा परिषदे कडून हा कारवाई बाबत अहवाल कोकण आयुक्त यांच्या कडे पाठविण्यात आला आहे.
◾उपसरपंच पदाची निवडणूक घेताना नियमानुसार निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली होती. परंतु जिल्हाधिकारी यांच्या कडून नोटीस आल्यामुळे याबाबत म्हणणे सादर करण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली आहे. सुनावणी मध्ये म्हणणे सादर करण्यात येईल.
— सुभाष केणी, ग्रामविकास अधिकारी सरावली