■शेतकरी संघटनांनी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना दिला शहिदांचा दर्जा
पालघर दर्पण: प्रतिनिधी
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. यासाठी त्यांनी श्रद्धांजली सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलनाचा आज २५ वा दिवस आहे. हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. मात्र असे असले तरीही सरकार कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही.
शेतकरी संघटनांनी आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना शहिदांचा दर्जा दिला आहे. आंदोलनात जवळपास ३० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याचे शेतकरी संघटनांनी ठरवले होते. श्रद्धांजली सभेमुळे देशभरातील शेतकरी या आंदोलनाशी जोडले जातील असे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले. त्यामुळे आज (रविवारी) २० डिसेंबर रोजी श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे फोटो असलेले पोस्टर देखील उभारण्यात आले होते. शेतकरी नेते गुरनाम सिंह चडूनी यांनी देखील सकाळी सांगितले की, देशातील सर्व जिल्हे, तहसील व गावांमध्ये श्रद्धांजली सभा होतील. यामध्ये आंदोलन करतेवेळी जीव गमावलेल्या शेतकऱ्यां श्रद्धांजली वाहिली जाईल.