◾ दिवाळी नंतर एक दोन दिवस बंद करण्यात आलेला बेकायदेशीर भंगार व केमिकल व्यवसाय अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी भंगार माफियांनी टाकले नेमके कोणते वजन
◾हेमेंद्र पाटील
दिवाळी नंतर एक दोन दिवस बंद करण्यात आलेला अवधनगर येथील अवैध भंगार व्यवसाय पुन्हा तेजीत आला आहे. बोईसर पोलिसांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून भंगार माफियांवर विशेष लक्ष देत अनधिकृत धंदे करणाऱ्याचे भंगार व्यवसाय बंद ठेवले होते. परंतु असा कोणते वजन आले की, दोन दिवसानंतर अवैध धंदा वैध होऊन पुन्हा सुरू झाला. औद्योगिक क्षेत्र लाभलेल्या बोईसर पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर धंदे नेहमीच तेजीत असतात. असे असले तरी या सर्व प्रकाराकडे सोईस्कर रित्या बोईसर पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यांच्या विरोधात तक्रारी करून देखील साधी चौकशी होत नाही. यावरून तरी आपल्यांना अवैध धंदे करणाऱ्यांचे हात किती वजनदार आहेत याचा अंदाज येत असेल.
बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील सरावली अवधनगर येथे अवैध भंगार व्यवसाय सुरूच असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, गुन्हेगारी वाढत चालली आहे. याबाबत संपूर्ण माहिती स्थानिक बोईसर पोलिसांना असून याच भागात काही अंतरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे कार्यालय देखील आहे. मात्र भंगार माफियांच्या दबावाखाली आलेल्या यंत्रणेमुळे माफियांना मोकळीक मिळताना दिसते. अवधनगर येथील भंगार माफिया कारखान्यातील चोरट्या भंगारा बरोबर रासायनिक घनकचरा व घातक रसायने असलेले ड्रम अशा गोष्टी आणत असतात. कारखान्यातुन आलेल्या भंगारात रासायनिक घटकांची विल्हेवाट निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी भंगार माफियांन कडून लावली जाते. मागील वर्षी याच ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या एका पोलिसाला भंगार माफियांनी दम देत आपली दहशत दाखवली होती. मात्र सामान्य माणसावर दंडूका शाही चालवणाऱ्या पोलिसांना माफियांवर काहीही कारवाई करता आली नाही. वरिष्ठ अधिकारी याच्यावर माफियांचे वजन असल्याने माफियांना अधिकच मोकळीक मिळत असल्याचे त्यावेळी दिसून आले होते.
सरावली महसूल क्षेत्रात सरकारी जागेवर व इतर भागात लहान मोठे असे एकुण 300 ते 350 भंगाराचे व्यवसाय असून यातील 8 मोठ्या भंगार व्यवसायांकडून महिन्याकाठी मोठा व्यवहार केला जातो. औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यात तांब व इतर महागड्या धातुची चोरी होते हे चोरी केलेले सर्व भंगार याच अवधनगर भागात विक्री केले जाते. याअगोदर काही गुन्हात याचा उलघडा झाला होता. येथील चोरी करणारे व त्यांची विल्हेवाट लावणाऱ्यांची बित्तंबातमी पोलिसांना असताना अशा माफियांवर मेहरबानी का असा सवाल अनेकदा उपस्थित झाला. मागील काही दिवसापूर्वी दोन दिवस बंद असलेल्या मोठ्या 8 भंगार काट्या नुसार भंगार माफियांन कडून प्रत्येकी 3 लाख 50 हजार महिन्याकाठी वसुल केले जातात. ही रक्कम कुठे वाटप केली जाते याचा मागोवा यंत्रणेने घेणे अपेक्षित आहे. याठिकाणी वाढलेल्या गुन्हेगारी मुळे याभागात एक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र ही चौकी महिन्यातून ठरलेल्या एकाच दिवशी उघडत असून यावेळी मोठे कामकाज बजावले जात असल्याची माहिती समोर येते. यामुळे अवधनगर भंगार व बोईसर पोलीस यांचे नेमके कनेक्शन काय याचा शोध घेण्याची गरज आहे.
बोईसर पोलीस ठाण्यात पोलीस मित्रांच्या नावाखाली काही दलालांना अधिकच महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात संधी शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातील मध्यस्थी करण्याचे काम हे दलाल करत असून अधिकाऱ्यांची
मर्जी त्यांच्या मार्फत राखली जाते. येथील अधिकारी यांच्या सोबत पोलीस मित्रांचे कार्ड दिलेले मध्यस्थी करणारे सोबत घेवून फिरत असल्याने गुन्ह्यात संधी शोधून बजावलेल्या कामकाजाचा कोणाला पत्ता देखील लागत नाही. अवधनगर भंगार माफियांवर पोलिसांचे असलेले दुर्लक्ष व दोन दिवस बंद झाले अवैध व्यवसाय पुन्हा कसे सुरू झाले याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा व पोलिसांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी येथील पोलीस निरीक्षक कधीही प्रतिसाद देत नाहीत. अशा प्रकारामुळे नेमके पाणी मुरते याची अधिकृतपणे खात्री होते. जर बोईसर भागात अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी पोलिसांचे सहकार्य लाभत नसेल तर अधिकारी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी सोबत बोलायला प्रतिक्रिया द्यायला घाबरतात का असा सवाल उपस्थित होत आहे.